पश्चिम
महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजेच
बालाघाट. या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या
पर्वतराईच्या खोबणीत वसलेला जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). सरता
ग्रीष्म आणि वर्षां ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची
झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके या झाडांवर वास्तव्याला असतात.
अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा हे धरण नगरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे.
नाशिक-पुणे-ठाणे जिल्हय़ातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवसीय पर्यटनासाठी हे
उत्तम ठिकाण.
भंडारदराच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या
रस्त्याने सुरुवात करता येते. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा
नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे. धरणापासून साधारण
२० किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरी नावाचे छोटेखानी गाव. इथून कळसूबाई
शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते. पांजरीहून पुढे घाटघरकडे जाता येते.
पांजरी, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात. घाटघरच्या
घाटणदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यंत रमणीय असतो.
धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्याचा येथे
बराच वावर राहिल्याने इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नावे दिल्याचे दिसून
येते. बालाघाट डोंगररांगांत कोकणकडय़ांच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग
आहे. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर
खाली भंडारदरा धरण बांधले आहे. भंडारदरा धरण भरले की, अतिरिक्त पाण्याचा
विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो.
फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच
त्याचे नाव अंब्रेला फॉल. दर वर्षी साधारण १५ ऑगस्टनंतर अंब्रेला फॉल काही
महिने पाहता येतो.
रतनगड डोंगराच्या पायथ्याशी अमृतेश्वर शिवालय आहे. धरण
पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो. हे हेमाडपंथी मंदिर
पांडवांनी बांधल्याची वदंता आहे. भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० कि.मी.
अंतरावर रंधा फॉल या मोठय़ा धबधब्याचे दर्शन घडायचे, मात्र आता कोंदणी विद्युत प्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा लुप्त झाला आहे.
भंडारदरा परिसरात निवांत भटकंती करायची म्हटले की,
पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो. पर्वतरांगेतील अलंग, कुलंग, मदनगडसह
हरिश्चंद्रगड, विश्रामगड या गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्टय़पूर्ण गावेही या
पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर फोकसंडी हे गाव.
चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर
ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर
होतो. थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून
कोतुळ, पळसुंदे (भरोबा) मार्गे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर
फोकसंडी गावात पोहोचता येते. फोकसंडीतून थेट माळशेज घाटात पोहोचण्यासाठीही
आता रस्ता झाला आहे.
जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या
किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड. अकोले, समशेरपूर, खिरविरे
फाटामार्गे विश्रामगडावर जाता येते. तीरपाडे पाचपट्टा पठारावरील पवन ऊर्जा
प्रकल्प पाहण्यासारखा आहे. डोंगरपठारावरील
८० ते ८५ पंखे भिरभिरतानाचे दृश्य विलोभनीय असते. याव्यतिरिक्त राजूर
शिरपुंजीमार्गे कुमशेतसारख्या दुर्गम आदिवासी भागाला भेट देणे आता सहजशक्य
आहे.
कळसूबाई, कुलंगगड, रतनगड, आजोबाचा डोंगर या सर्व
शिखरांतील शेवटचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड. अत्यंत अवघड चढणीचे हे शिखर.
ठाणे, पुणे आणि नगर जिल्हय़ातून या गडाकडे जाता येते. नगर जिल्हय़ातील कोतुळ,
शिरपुंजी, पाचनईमार्गे हरिश्चंद्रगडाकडे जाता येते. हरिश्चंद्रगडालगतच
तारामती, रोहिदास ही शिखरे पाहायला मिळतात. वन्यजीव दर्शनही अनुभवता येते.
निबिड जंगल, उंच डोंगर, खोल दऱ्या, मुळा नदीचे पात्र अशा वैशिष्टय़पूर्ण
भौगोलिक स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी.
उंबर, जांभूळ, कारवी, पांगारा, मोहाची झाडे अशा
वृक्षवल्लरी, तर कोल्हा, साळुंदी, बिबटय़ा, रानडुक्कर, विविध प्रकारचे साप,
सरडे असे वनचर आणि सातभाई, भारद्वाज, बुलबुल, कोकिळा, खंडय़ा, वेडा राघू आदी
पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात. हिवाळ्यातही या परिसराचं रूपडे
अवर्णनीय असते. अनेक प्रकारच्या रानफुलांनी इथले डोंगरपायथे सजतात.
सपर्वताच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता
निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत. उन्हाळ्यात गिरिभ्रमण,
उन्हाळा-पावसाळ्याच्या संधिऋतूत काजवा महोत्सव, पावसाळी पर्यटन आणि
हिवाळ्यात पुष्पोत्सव असे वर्षभर पर्यटन करण्यासारखा हा परिसर. कधी काळी
दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गावे आता डांबरी रस्त्याने
जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा सरावाच्या व्हायला लागल्या
आहेत.
इतर पर्यटनस्थळी बाजारपेठांमुळे आलेला बकालपणा इथे
नाही. स्वच्छ पर्यटनामुळे अनट्च्ड नेचर इथे अनुभवता येते. अर्थात इथले
पर्यावरण, स्वच्छता या बाबी जपणे पर्यटकांच्याच हाती आहे.
(शांताराम काळे, लोकप्रभा २० जुलै, २०१२) |
|
No comments:
Post a Comment