Wednesday, 20 February 2013


Published: Sunday, February 17, 2013
शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांचे सहा सहकारी यांनी बहलोलखानाशी एकाकी झुंज देऊन बलिदान दिले ते ठिकाण म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्य़ातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी खिंड. इथली शतक पार केलेली प्राथमिक शाळा. या शाळेचे काळानुरूप रूपडे बदलत चालले आहे.
नवनवीन वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञान यामुळे शिक्षणाचे व व्यवसायाचे जग यात एक दरी निर्माण झालेली दिसते. ती कमी करण्यासाठी शिक्षण सामाजिक गरजांशी निगडित असले पाहिजे हे लक्षात घेऊन शाळेने मुलांना हस्तकलेचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देऊन काही उपक्रम राबविण्याचे ठरविले. शिक्षणक्रमातही त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
या हस्तकौशल्याचा उपयोग मुलांच्या पुढील आयुष्यात होणे सहज शक्य आहे.
नवनिर्मिती, जिज्ञासा, आत्मप्रकटीकरण या सहज प्रवृत्तींचा आविष्कार करण्याची संधी मुलांना बालवयातच दिली पाहिजे. भविष्यातील विविध उद्योगांतील कौशल्य व क्षमता संपादन करण्याचा पाया बालवयातच घातला जातो. मुलांच्या मनातील कल्पनांना कृतीद्वारे प्रकट रूप दिल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो असा अनुभव येतो.
कार्यानुभव विषय गांभीर्याने व कौशल्याने नियोजनपूर्वक राबविण्याचे ठरवून काम करीत असल्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळत असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण झाली. कोणतेही काम कमी महत्त्वाचे नाही हा संस्कार आपोआपच घडला आणि स्वावलंबनाचे महत्त्वही त्यांना समजले.
कार्यानुभवांतर्गत राबवले जाणारे उपक्रम
१) शून्य कचरा :
कचऱ्याचे व्यवस्थापन करून ओला कचरा व सुका कचरा असे त्याचे वर्गीकरण मुलांकडून करून घेतले जाते. त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्र शिकवले जाते.
२) उत्पादक उपक्रम :
भाजीचे वाफे, वृक्षारोपण, बागकाम, राख्या तयार करणे, वॉलपीस तयार करणे या उपक्रमांनी नेहमीच कृतिप्रवणेतला चालना दिली जात आहे.
३) कागद काम :
१. घडीची किमया, २. कातरकाम (फुले), ३. शोभिवंत कागदी वस्तू तयार करणे.
४) टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती  :  करवंटय़ांपासून शोभिवंत वस्तू, बाटल्या, बल्ब, काडय़ांपासून शो-पीसनिर्मिती.
या तयार केलेल्या वस्तूंचे वर्षांअखेरी प्रदर्शन मांडले जाते. त्यांना अधिकारी, पालक  भेट देतात व मुलांचे कौतुक त्यांच्याकडून होते.
या उपक्रमाबरोबरच शाळेत इतरही उपक्रम राबवून सर्वागीण विकास साधण्याचा शिक्षकांचा सतत प्रयत्न असतो.
कांही नोंद घेण्याजोगे उपक्रम -
१) त्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जात असल्याने शाळेतील ७४ विद्यार्थी राज्य शिष्यवृत्ती मिळवू शकले.
२) अप्रगत मुलांसाठी जादा तास व वैयक्तिक लक्ष पुरविले जाते.
३) वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी 'किशोर मंचची' स्थापना केली आहे.
४) पालक-संपर्क सातत्याने राहावा म्हणून शाळेत 'पालकांसाठी वाचनालय' हा उपक्रम राबविला जातो.
५) मासिक उपस्थिती १०० टक्के असेल त्या विद्यार्थ्यांला व त्याच्या पालकांना अभिनंदनाची पत्रे लिहून प्रोत्साहन दिले जाते.
या उपक्रमाबरोबर समविचारी शिक्षकांना एकत्र करून 'सृजन आनंद शिक्षक सहविचार मंच' असा एक मंच स्थापन केला आहे.
या मंचमध्ये परिसरातील व तालुक्यातील शाळांतील शिक्षक, शिक्षिका सभासद म्हणून सामील झाल्या असून, एक प्रकारचे उपक्रमशील शिक्षकांचे जाळेच तयार झाले आहे. महिन्यातील एका रविवारी एकत्र जमून आपल्या कामाचा आढावा घेतला जातो. अडचणींवर विचार केला जातो. नव्या पुस्तकांचे वाचन होते. सामुदायिक उपक्रम कोणते राबवायचे त्याचा विचार होऊन आखणी केली जाते. 'लेखन-वाचन' छंद वर्ग, बाल आनंद मेळावे, प्रश्नमंजूषा, मान्यवरांच्या मुलाखतींमधून जीवनानुभूतीचा आनंद सांस्कृतिक कार्यक्रमांतून कलेला वाव, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी कपडेदान, निधी गोळा करणे, 'लेखक-कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला' यात कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. राजा शिरगुप्पे यांची भेट असे कार्यक्रम यात घेतले जातात.
या मंचमार्फत बाल साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत नीलम माणगावे, बाबा भांड, रजनी हिरळीकर, हेमा गंगातीरकर, मुकुंद निगवेकर, गोविंद गोडबोले यांसारख्या साहित्यिकांचे विचार शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले.
अशा रीतीने एक कृतिशील शाळा म्हणून शाळेचे रूपही बदलले आहे.
केंद्रशाळा, नेसरी, ता. गडहिंग्लज,
(मोबाइल- ०८००७११७०६६)
(हे उपक्रम शाळेच्या शिक्षिका शशिकला पाटील यांच्या कल्पनेतून साकारले आहेत.)

No comments:

Post a Comment