नाशिकजवळच्या धारवाडी नावाच्या एका आदिवासी वस्तीत शिकवणाऱ्या एका तरुण, अवलिया शिक्षकाची अलीकडेच भेट झाली आणि त्याच्या कामाचे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या कुणालाही त्याचे कार्य प्रेरित करणारे ठरेल, म्हणून लेखप्रपंच मांडावासा वाटला. या शिक्षकाचे नाव आहे राम सुरासे. त्याच्या मनातील आदिवासींच्या मुलांविषयीची असणारी तळमळ पाहून हा शिक्षक खरोखरीच आदिवासी मुलांच्या उन्नतीसाठी प्रकाशाचे किरण घेऊन आला आहे, याची खात्री वाटते. या शिक्षकाचे वय आहे, अवघे २५; मात्र अल्पावधीतच त्याच्या गाठीला कामाचा मोठा अनुभव जमा झाला आहे.
धारवाडी- निसर्गाच्या सान्निध्यात सह्य़ाद्रीच्या डोंगरातील कळसुबाई शिखराच्या अतिवृष्टीच्या प्रदेशात वसलेले २०-२२ घरांची छोटीशी वस्ती असलेले नाशिक जिल्ह्य़ातील गाव. आग्रा-मुंबई महामार्गावर मुंबईपासून १२५ किमी तर नाशिकपासून ४५ किमीवर अंतरावर असलेले. या गावातील शाळेत गेल्या साडेतीन वर्षांंहून अधिक काळ राम सुरासे शिकवत आहेत. ही शाळा अजूनही या वस्तीतील एका व्यक्तीच्या घरातील कोपऱ्यात भरते. या वस्तीतील लोक आदिवासी ठाकर समाजाचे असून, दोन-चार झोपडीवजा घरं आहेत. बाकीचे सर्व जंगलात वास्तव्याला असतात.
राम सुरासे हे मुळचे जालना जिल्ह्य़ातील भेंडाळा ता. घनसावंगी इथले. पुण्यात डी. एड्. पदविका पूर्ण केल्यानंतर जानेवारी २००९ मध्ये राम सुरासे यांना नाशिक जि. प.मध्ये शिक्षणसेवक म्हणून तीन हजार रुपये वेतनाची नोकरी मिळाली. इगतपुरी तालुक्यातील धारवाडी (भावली खुर्द) या शाळेवर त्यांची नियुक्ती झाली. भावली खुर्द हे गाव इगतपुरीपासून आठ किमी. तिथल्या बसस्थानकावर उतरल्यानंतर श्री. आगिवले यांच्यासोबत ते वस्तीकडे जायला निघाले. जाताना आगिवले यांनी सुरासे यांना भावली धरण दाखवले आणि त्यांना कल्पना दिली की, शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज या धरणाची भिंत चढून जावी लागणार आहे. धरणाच्या कडेने कच्चा रस्ता होता तो. डोंगरदऱ्यातून चढ-उताराची ओबडधोबड पाऊलवाट होती ती. भावली येथून सहा किमी अंतरावर त्यांची शाळा होती. चालताना मध्येच धामडकी नावाची छोटीशी वस्ती लागली. त्या गावानंतर धारणा नावाची मोठी नदी आहे. ती पार केली म्हणजे धारवाडी हे गाव लागते. पावसाळ्यात नदीला पूर आला की शाळा बंदच असते, हेही त्यांना समजले.
तीन तास चालल्यानंतर ते दोघे धारवाडी वस्तीवर पोहोचले. वस्तीवर चार-पाच झोपडीवजा घरं होती. वस्तीवर फाटके कपडे परिधान केलेली, काळा-सावळा वर्ण असलेली चार-पाच पुरुष मंडळी, काही महिला व पिंजारलेल्या केसांची मुले त्यांच्याभोवती गोळा झाली. आगिवले यांनी गावकऱ्यांना आदिवासी भाषेत नव्या गुरुजींचा परिचय करून दिला.
त्या ठिकाणी पोहोचल्यावर राम यांनी न राहवून आगिवले यांना विचारले, 'कुठे आहे आपली शाळा?' त्यावर त्यांनी अंगुलीनिर्देश करत नव्या शिक्षकाला त्यांची शाळा आणि फळा दाखवला. सुरासे थोडा वेळ चक्रावून गेले. ते ज्या ठिकाणी बसले होते, त्या ओटय़ाच्या बाजूलाच एक घर होतं, त्याला लागून एक पडवी होती. त्या ठिकाणी आगिवले त्यांना घेऊन गेले. खाली शेणाचा वास, कोंबडय़ाची दुर्गंधी छळत होती. तीच होती त्यांची शाळा. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग या कुबट वासाने व्यापलेल्या जागेत भरायचे. शाळा म्हणून त्या ठिकाणी फक्त एक जुना फळा लटकत होता, या जागी रात्री गुरांचा गोठा असायचा.
आगिवले पाच-दहा मुले आणि रेकॉर्डची पिशवी घेऊन त्यांच्याजवळ आले. त्यातीलच एका मुलाने राम यांना लाकडी मोडकी खुर्ची आणून दिली. रेकॉर्डच्या पिशवीत चार-पाच महत्त्वाची रजिस्टर्स होती. 'ती सदोदित सोबत बाळगावी लागतात. अधिकारी केव्हाही माहिती मागतात,' असा सल्ला आगिवले यांनी नव्या शिक्षकाला दिला. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या अनुभवाबद्दल सांगताना राम सुरासे म्हणतात - 'समोर बसलेल्या मुलांचे कपडे फाटलेले.. शर्टाची बटणं तुटलेली.. नखे, केस वाढलेली होती. या आदिवासी गावात पाणी, वीज, आरोग्य सुविधा नावालाही नाहीत. इतकंच काय, ये-जा करण्यासाठी साधा रस्ताही नाही.
सुरासे यांना मुलांशी संवाद साधण्यासाठी तिथली स्थानिक भाषा शिकावी लागली. ते म्हणाले, 'त्यांची बोली जलद उच्चारांची आहे. उदा. 'अरे, कुठे निघाला आहेस?' याला 'नार, कुकरं चाललाय?' असं म्हटलं जातं. १५-२० दिवसांनंतर मुलं माझ्याशी बोलायला लागली. मात्र, शाळेत शिकवताना मला पुस्तकातील प्रमाणभाषा त्या मुलांना शिकवावी लागायची.'
या मुलांना त्यांनी बाराखडी गिरवण्यापासून शिकवायला सुरुवात केली. त्या मुलांसाठी पुस्तकातील प्रमाण मराठी शिकणं हे इंग्रजी शिकण्याइतकंच अवघड होतं. त्या शाळेतील पहिली ते चौथीची पटसंख्या २५ होती. मात्र शाळेत दररोज १४-१५ मुलेच यायची. राम यांनी गावातल्या मुलांची यादी केली आणि दुसऱ्या दिवसापासून दारोदार फिरून ते मुलांना शाळेत घेऊन येऊ लागले. गावातील पालकांना शाळेचे, शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायला लागले.
'शिक्षणाने आम्हांला खायला मिळणार आहे का,' असा प्रश्न गावातले लोक सुरासे यांना विचारायचे. शेतात कष्ट उपसून भात पिकवावा, पावसाळ्यात भातशेती करून नंतर मुंबईला कंत्राटी कामांसाठी जावं, असा तिथल्या लोकांचा जीवनक्रम. अशा वेळी घरातल्या तान्ह्य़ा मुलांना, म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्याचं काम शालेयवयीन मुला-मुलींवर यायचं. पावसाळ्यात ओढे-नाले पार करत, डोंगर-दऱ्या चढून शाळेत यायचं मुले टाळत. पण हळूहळू रामच्या प्रयत्नांना यश यायला लागले. शाळेतील मुलांची संख्या वाढायला लागली. मात्र, यासाठी राम यांना दररोज तीन तास वेळ द्यावा लागायचा.
आदिवासी ठाकर समाजाचे वास्तव्य मुळातच जंगल, दऱ्याखोऱ्यांत असल्याने शिक्षणापासून, सुधारणांपासून त्यांचं जगणं अलिप्त होतं. कुटुंब नियोजन नसल्याने प्रत्येकाच्या घरात सात-आठ मुले. वस्तीत आरोग्याच्या स्थितीची पुरती वाताहत असल्यामुळे मुलं सदैव आजारी पडायची. राम सुरासे यांनी गावकऱ्यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले. गावकऱ्यांचे दारूचे व्यसन सुटावे, म्हणून प्रयत्न केले.
शिक्षणसेवक म्हणून अल्प वेतनात काम करत असतानादेखील राम यांनी गरजू मुलांना वेळोवेळी वह्य़ा, पेन, पाटी, पुस्तके घेऊन दिली. शाळेत अभ्यासक्रमासोबतच विनोदी गाणी, बडबडगीत, गोष्टी, समूह नृत्य, वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून, मनोरंजनातून शिक्षण व त्याद्वारे मुलांना शाळेची गोडी लावली. मुले शाळेत टिकावी, यासाठी लहान उपक्रम राबवले. वेगवेगळे प्रयोग केले. शाळेचे नवे रेकॉर्ड तयार केले. शाळा अनुदानातून दोन कपाटं, खुच्र्या, टेबल व मुलांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य खरेदी केले. शाळेची पडवी पताकांनी सजवली. वेगवेगळे तक्ते, नकाशे, चित्रे लावल्यानंतर त्या जागेला शाळेचे स्वरूप प्राप्त झाले. प्रथमोपचार पेटीच्या माध्यमातून मुलांना आरोग्यविषयक सवयी लागल्या.
मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी भोवतालची परिस्थितीही पोषक असावी लागते. या वस्तीत त्या वातावरणाचा संपूर्णपणे अभाव होता. याचे उदाहरण सांगताना राम सुरासे म्हणाले, 'विलास नावाचा तिसरीतील मुलगा १२ वाजता शाळेत यायचा. तीन वाजता कुठले ना कुठले कारण सांगून घरी पळायचा. एके दिवशी रागे भरून 'आज शाळा सुटेपर्यंत तुला घरी जाऊ देणार नाही,' असे म्हटल्यावर तो मुलगा ओक्साबोक्शी रडायला लागला. नंतर त्याच्या चुलतभावाकडून कळले की, त्याचे बाबा भात पेरणी करून रोजंदारीवर मुंबई येथे कामासाठी गेले आहेत. आईला लहान मुलाला सांभाळत शेतातील गवत काढावं लागतं. त्यामुळे गुरे सांभाळण्यासाठी घरी कुणीच नाही. विलासला ते करावं लागतं. सकाळी गुरं चरायला न्यायची, १० वाजता परत बांधायची, नंतर अंघोळ, जेवण उरकून शाळेसाठी एक किमी पायी चालत येईपर्यंत १२ वाजायचे. दुपारी चार वाजता परतून पुन्हा गुरं चरायला नेणं आणि अंधार झाल्यावर गुरं गोठय़ात बांधायचं काम त्याच्यावर होतं.' कारण कळल्यानंतर अर्थातच सुरासे यांनी त्या मुलाला शाळेत उशिरा येण्याची आणि घरी लवकर जाण्याची मुभा दिली.
'सर्व शिक्षा अभियाना'अंतर्गत राबवली जाणारी 'शालेय पोषण आहार योजना' ही या शिक्षकासाठी मोठी समस्याच ठरत आहे. शाळेत पोहोचण्यासाठी कोणताही वाहन रस्ता नसल्याने कुठलेही वाहन तिथे येत नाही. भावली (खुर्द) येथून सहा किमी. तांदूळ व इतर किराणा माल स्थानिक लोकांना मजुरी देऊन शाळेत आणावा लागतो. त्याकरता प्रत्येक खेपेस मजुरांची शोधाशोध आणि इतर बाबतीत दोन-तीन दिवस वाया जातात. मागच्या तीन वर्षांत त्यांना बऱ्याचदा असा अनुभव आला की, शाळेत पोहोचून एक तास होत नाही, तोच तांदूळ वितरकाचा त्यांना फोन येतो की 'तांदूळ आणलाय, उतरून घ्या.' सलग दीड-दोन तास पायी चालत येऊन साडेदहा वाजता शाळेवर पोहोचलेले राम लगेच १२ वाजता अजून सहा किमी रस्ता तुडवत दोन वाजता भावली येथे पोहोचतात. तांदूळ उतरवून घेत तिथल्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी ठेवतात आणि मग तो शाळेपर्यंत कसा नेता येईल, या तयारीला लागतात. यासंदर्भातील त्यांचा जून २००९ सालचा किस्सा लक्षात राहण्यासारखा आहे. त्यांना शाळेत रुजू होऊन पाचच महिने झाले होते. ५० किलो तांदूळ भावलीच्या शाळेत त्यांनी उतरवून घेतला खरा; पण चार-पाच दिवस कुणीही मजूर पैसे देऊनसुद्धा तांदुळ पोहोचवायला तयार होत नव्हता. शेवटी राम आणि श्री. आगिवले या दोघांनी २५ किलोचे पोते न्यायचे ठरवले. ओझे घेऊन डोंगर चढताना जीव जायची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, तांदूळ आणल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्यांचा थकवा क्षणात दूर झाला.
शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा त्यांचा उत्साह एके वर्षी त्यांच्या जीवावरही बेतला होता. त्याबाबत सांगताना राम म्हणाले, '१५ ऑगस्ट २०१० रोजी मी सकाळी लवकर शाळेत जायला निघालो. रात्रभर पाऊस पडून गेला होता. धामडकी गावातून पुढे गेल्यावर धारणा नदी लागते. त्या दिवशी नदीने विशाल रूप धारण केले होते. लाल मातीवरून वाहून आलेले गढूळ पाणी, नदी पार करायची हिंमत होत नव्हती. मात्र, स्वातंत्र्यदिनानिमित्त मी विद्यार्थ्यांना शाळेत लवकर हजर राहायला सांगितले होते आणि म्हणून आपण शाळेत पोहोचणं आवश्यक आहे, असं मानून मी नदी पार करू लागलो. या नदीत वाळू, चिखल अजिबात नाही, आहे तो फक्त खडक. नदी पार करण्यासाठी दोन्ही टोकांना एक तार लावलेली होती. मी तारेच्या आधाराने जायला निघालो. बघता बघता पाणी गुडघा, छातीला लागले. खडकावरून पाय सारखे निसटत होते. मागे पाणी अन् पुढे पाणी. मला साक्षात मृत्यूच समोर दिसत होता. पाय न उचलता हळूहळू त्या खडकावरून कसाबसा नदीचा काठ गाठला आणि जिवात जीव आला. मात्र ही गोष्ट नदीकाठी राहणाऱ्या पिंटूच्या आईने जवळून पाहिली होती. ती मी जवळ जाताच जोरात ओरडली. 'काय गरज हाय नईतून यायची? पाय सरकला म्हंजी? गुर्जी, नईला पक्का पाणी असला ना, यायचाच नाही. धरणात जेलातं गावणार नाही.'
मुख्याध्यापक असल्याने शाळेतील प्रशासकीय जबाबदाऱ्याही त्यांना पार पाडाव्या लागतात. याच भागातील धामकडी, गव्हांडे, जामुंडे, कामडवाडी येथील धडपडे शिक्षक प्राप्त परिस्थितीचे भांडवल न करता शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या या मुलांना 'शाळा' नावाच्या गोष्टीविषयी आपुलकी निर्माण करण्याचे महत्त्वाचं काम करतात. मुलं शिकू लागली, तसे पालकही त्यांच्या शिक्षणाबाबत जागरूक बनले. अनेकांनी आपली मुले तालुक्याच्या आश्रमशाळेमध्ये दाखल केली. सुरासे यांनी या गोष्टीचा मागोवा घेतला तेव्हा कळले की, आपल्या मुलाला लिहितावाचता येतं म्हणजे मूल हुशार झालं आहे, असं पालकांना वाटू लागलं आहे. वस्तीत राहिली की, मुलं खेकडे, मासे, पाखरं मारायला जात असत. मात्र आश्रमशाळेत मुलांना अनेक गोष्टी मोफत मिळतात. त्यात तीन वेळचं जेवण, निवासाची सोय, वह्य़ा-पुस्तके, गणवेश यांचा समावेश असतो. तिथे अभ्यासाशिवाय कुठलेच काम मुलांच्या वाटय़ाला येत नाही. याचा परिणाम सुरासे यांच्या वस्तीच्या शाळेवर झाला. त्यांच्या शाळेची पटसंख्या कमी झाली, मात्र एका गोष्टीचे मनातून समाधान वाटले की, पक्ष्यांच्या, गुरांच्या पाठीमागे धावणारी, जंगल-दऱ्यांतून फिरणारी ही मुलं आता अक्षरे गिरवू लागली आहेत. कुठे ना कुठेतरी शिकत आहेत. 'ही सुरुवात आहे, आणि अजून या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप काम करायचं आहे,' असं राम आवर्जून सांगतात.
आदिवासी मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगताना ते आपली मतं हिरीरीनं मांडतात. ते म्हणतात, 'आपल्या शिक्षणपद्धतीतील सर्वात मोठा दोष म्हणजे आपण शहरी, ग्रामीण आणि आदिवासी या तीन जीवनपद्धतींना एकाच शिक्षणाच्या चौकटीत बसवतो. आणि त्यामुळे आदिवासी मुलांना प्रमाण अभ्यासक्रम शिकविताना शिक्षकाची दमछाक होते. त्या मुलांनाही पुस्तकातील संदर्भाचे किती आकलन होते, हादेखील संशोधनाचा विषय आहे.'
आपल्या भोवतालच्या शाळा आणि राम सुरासे यांच्या आदिवासी वस्तीवरच्या शाळेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. शहरी शाळांमधील सुविधा आदिवासी मुलांपर्यंत पोहोचायला बराच कालावधी सरावा लागेल. मात्र, तरीही 'अमूक अमूक नाही,' असे रडे न गाता पूर्ण सामर्थ्यांनिशी शक्य तितके प्रयत्न करत या मुलांच्या उन्नतीसाठी काम करणारे रामसारखे शिक्षक आज आदिवासी वस्तीमधील शैक्षणिक अंधाराला भेदण्याचं मोलाचं काम करत आहेत. हे शिक्षक खऱ्या अर्थाने दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी प्रकाशाचा कवडसा बनले आहेत.
No comments:
Post a Comment