Sunday, 24 February 2013

 एखादी गृहिणी स्वयंपाक घरात शिरते... भाजी करायची म्हणून पात्रात तेलाची धार ओतते... तेल, कांदा, लसूण, आलं घालून सुगरण स्वयंपाक तयार करते.. घरातील सर्व मंडळी या पक्वान्नांचा आस्वाद घेतात. मात्र, इतरांच्या तोंडाला हा स्वाद आणणाऱ्या त्या तेली समाजाचे तोंड बेचवच असेल याची पुसटशी कल्पनाही कोणाच्या मनात येत नाही. होय! ही व्यथा आहे या समाजाची.

इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या या तेली समाजाची राज्यभरातील लोकसंख्या 85 ते 90 हजारांच्या घरात आहे. पूर्वीपासून घालून देण्यात आलेल्या पायंड्यानुसार तेलघाणी चालविणे, तेलबियांचा व्यवसाय, शेती, आलू, कांदा, लसणाच्या व्यापाऱ्याच्या भरवशावर या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. पण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाकीट बंद आणि ट्रिपल फिल्टर्ड तेलाची मागणी वाढल्याने या समाजबांधवांकडून चालविण्यात येत असलेल्या तेलघाण्या हळूहळू बंद पडल्या. आता तर बोटावर मोजण्या इतक्‍या ठिकाणीच त्या सुरू दिसतात.

मोठ्या कंपन्यांच्या तेल गिरण्यांना परवाने देताना राज्यकर्त्यांनी परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या समाजाचा जराही विचार न केल्याने त्यांचा परंपरागत व्यवसाय मोडीत निघाला. ग्रामीण भागात शेती करून उदरनिर्वाह करणेही आता अवघड झाले. त्यामुळे प्रचंड स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी समाजातील युवापिढीला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. ओबीसी आरक्षणात समाजाचा समावेश असल्याने उपलब्ध असलेल्या 13 टक्के आरक्षणातच या समाजाला सारं काही निभावून न्यावे लागते. प्रचंड आंदोलने केल्यानंतर कोठे ओबीसींना देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा लाभ या समाजाच्या पदरात पडला. प्रगती साधण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर संघर्षच करावा लागत असल्याने इतरांचे भोजन स्वादिष्ट बनविणाऱ्या या समाजाच्या वाट्याला मात्र बेचवच आली आहे.

महामंडळाच्या मागणीला जोरतेली समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे संताजी महामंडळ अस्तित्वात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून तेली समाजाला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, शिष्यवृत्ती, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी समाजबांधवांची अपेक्षा आहे. शिक्षणामुळे 50 टक्के समाज प्रगत झाला आहे. उर्वरितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

No comments:

Post a Comment