कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची!
शेंडी
गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या
भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा
अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला.
तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या
पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे. निसर्गशिल्पांचे देखणे
कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची
बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली.
वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या
धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे.... उत्तर
रतनगडाच्या
माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ
बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे.
अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट
उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये
याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली
आहे. .....
या
धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून
लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या
भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार
पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले.
उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे
व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे
गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून
अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.
कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा
पुढे
निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला. खालच्या भागातील बारमाही पिके फुलवणारे
प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर -अकोलेकरांच्या नजराणा खुणावू लागले.
यातूनच ८० च्या दशकात 'कमिटेड वॉटर' विरुद्धचा लढा संगमनेर - अकोलेकरांनी
खांद्याला खांदा लाऊन लढविला. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. १९८४ मध्ये
भंडारद-याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर - अकोल्याला हक्काचे पाणी
मिळाले. मात्र त्यातच पुढील पाणी संघर्षाचीही बीजे पेरली गेली, असे
म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कमिटेड वॉटरविरुद्ध सुरु झालेला लढा पाण्याचे
फेरवाटप या नंतर पुढे पाणी तापू लागलं. १९९० च्या दशकानंतर तर भंडारद-याचे
पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची
उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे,
आंदोलने, घेराव यातून काही जणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात
केली. भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट.
मात्र नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने ( मेरी) उपहारग्रहाद्वारे
साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. यात अभ्यासात धरणाच्या
साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष
अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले.
परंतु या धरणात गाळ साचलेला नाही, असे अभ्यासकांचे ठाम मत आहे.
धरणाची
उंची वाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला. पाणलोट क्षेत्रातील
आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. आमदार मधुकर पिचड यांनी आपले
राजकीय वजन पणाला लावले. पुढे प्रस्ताव स्थगित ठेवण्याची ग्वाही मिळाली.
त्यामुळे पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थतेला सध्या तरी
पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यानच्या काळात भांडरद-याच्या पाण्याचा उपयोग
शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता वीजनिर्मितीसाठीही होऊ
लागला. भंडारदरा -१ आणि कोदणी येथील दोन जलविद्युत प्रकल्पातून ४४ मेगावाट
वीज निर्माण केली जाते. धरण परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकास
करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.भंडारद-याचा निळाशार,
अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी
प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची
बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे.
तें
बाकी काहीही असो. कोणत्याही दिवसातल्या म्हणजे बारा महिन्यातील कधीही
पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे, यात मात्र कोणताही वाद नाही.
येथील भेट आपल्याला निश्चित आनंद देते. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न
करतेदुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला
परिसर अशी कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख
आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती
येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी
देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरु होणारा
जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव.
अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई - हरिश्चंद्रगडाच्या या
परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे.
सर्वोच्च
शिखर कळसुबाई, खड्या उंचीचा महाकाय हरिश्चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा
विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर,
भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची
बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे आभाळाला भिडणारे
सुळके, उरात धडकी खोल द-या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण.... आणखीनही बरेच
काही..... निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली की भटकंतीचे
चीज होते.
हिमालयाच्या
खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत सह्यगिरी
आणि त्यातही कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा हा परिसर [कासच्या पठाराच्या
बरोबरीने] जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ( हॉट स्पॉट) एक समजला
जातो. पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर,
डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीने हिरवा
शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे.
फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या
मधमाश्या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व - किन्नरांची मैफल
भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू
भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत
आहेत. या मयसभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची
भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो.
मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते.
फुलझाडाचे
प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप,वेली आणि झाडे असे चार प्रकारात वर्गीकरण
करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे.
दाटीवाटीने उगवलेली वा-यावर डोलणारी गवतफुले पाहिली की, आपले मनही नकळत
'गवत फुला रे गुवत फुला...' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक,
सौंदर्यवान नववधूसारखी ! काही एकदम चिमुकली नाजुकशी म्हणजे १.५ मिलीमीटरची
तर काही अगदी टपोरी २५० मिलीमीटर आकाराची. वर्षभरात फुलणा-या फुलांत
पांढ-या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक असतो. त्याखालोखाल गुलाबी, निळा,
पिवळा, लाल, हिरवा या रंगांचा क्रमांक लागतो.
नवरात्रोत्सवाचे
आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे.अगदी वर्षानुवर्षांचे. सह्याद्रीत सर्व
ऋतुंमध्ये फुलणा-या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे. परंतु याचा बहर
पीक पॉईंटला असतो तो सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली
असली तरीसगळ्यात जास्त भाव खातेय ती पिवळी सोनकी!
सोनकीच्या
इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे
पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा,
फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी,
गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... आणखी कितीतरी
फुलांची! मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर
स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे.
युगानुयुगांची.
येथील
नवलाई स्थळविशेष गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी
न्याहाळले आहे. विविधांगांनी. मात्र 'माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या
सह्यापर्वताची ओळख नव्यानेच होते आहे. सभोवतीच्या गिरीशिखारांप्रमाणेच ही
इवलाली रानफुले निसर्ग प्रेमींना साद घालताहेत. मग कधी येताय? अशोकराव
भांगरे (भंडार दरा )
No comments:
Post a Comment