अभयारण्य निसर्ग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत वन्यजीव विभागाने मागच्या वर्षांत कळसुबाई-हारिश्चंद्रगड क्षेत्रात १ कोटी ६६ लाख रूपये खर्च केले आहेत. मुख्यत्वे रतनगड परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न असल्याचे वनक्षेत्रपाल पी. टी. पाटील यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अमृतेश्वर मंदिर परिसर, रतनगडावरील २४ कुंडातील गाळ काढण्यात आला, गडावर सौरदिवे लावण्यात आले आहेत. तसेच कोकणात उतरणाऱ्या कल्याण पायऱ्यांच्या अवघड दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील नऊ गावात पर्यटकांनी वेळ घालवावा, रमावे म्हणुन रतनवाडी येथे आकर्षक दगडी ओटे, त्यावर छत, सभोवताली हिरवळ विविध रंगीत फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. प्रसिद्घ पांजरे बेटाचा विकास करुन तिथे नविन वृक्ष लागवडीबरोबरच वाहनतळ उभरण्यात आला आहे. प्रत्येक पॉईंटवर वीस प्रसाधनगृहे बांधली आहेत. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी पॅगोडाही बांधले आहेत. पर्यटकांना पशुपक्षी निरीक्षणासाठी मोठे मनोरे उभरण्यात आले आहेत.
अभयारण्यात समाविष्ट करण्यात आलेल्या नऊ गावात तसेच प्रत्येक पॉईंटवर सौरदिवे लावण्यात आल्याने हा निसर्गरम्य परिसर उजळून निघाला आहे. सांदन दरी व घाटणदेवी येथे रेलींग करण्यात आले आहेत. रतनगडावर जाण्यासाठी अवघड असणारा मार्ग सोपा करुन चार नविन शिडय़ा बसविण्यात आल्या आहेत. तेथील रत्नाई देवीचे मंदिरही सुशोभित करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे व त्याखालच्या रस्त्यांचीही दूरुस्ती करण्यात आली आहे. वनविभगाकडे कर्मचारी वर्ग कमी असुनही दिवस-रात्र काम करुन ही कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यात आली आहेत. वनपाल बी. डी. शिंदे, आर. जी. बुळे यांची त्याकामी मोठी मदत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. पर्यटकांकडून होणारे उत्पन्नही आता वर्षांगणिक वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment