शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी उभे आयुष्य गेल्याने निसर्गाची भाषा अवगत असलेला आदवासी अवलिया कलाकार आता वृध्दापकाळात मात्र जगण्यासाठी संघर्ष करतो आहे. लहानथोरांपासून पंतप्रधानांपर्यंत अनेकांच्या कौतुकाचा धनी ठरलेल्या या कलाकाराचे हे धन जगण्यासाठी मृगजळच ठरले आहे. आयुष्यभर अनेकांचे मनोरंजन करूनही त्याला 'भाकरीच्या अर्धचंद्राची'च भ्रांत आहे.
आदिवासी कुटूंबात त्यांचा जन्मलेल्या ठकाबाबाचे वय आता ८० आहे. ठकाबाबा कृशाबा गांगड असे त्यांचे पुर्ण नाव, मात्र सह्य़कडय़ाच्या या पंचक्रोशीत ठकाबाबा हीच त्यांची ओळख. अकोले तालुक्यातील उडदावणे या दुर्गम गावात सन १९३२ मध्ये ठकाबाबाचा जन्म झाला. नगर जिल्ह्य़ातील पश्चिमेच्या टोकाकडील भंडारदरा धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावातच खडकाळ माळ रानावर २, ३ एकर शेती आहे, पण पाण्याचा पत्ता नाही. उपजिविकेचे दुसरे साधन नाही, घरात सात माणस. पशु-पक्षांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या 'नाना कळा' हेच ठकाबाबांचे आयुष्टाचे भांडवल, अगदी सहजगत्या ते जीभ नाकाला टेकवतात.
सह्य़ाद्रीच्या या डोंगररांगात धुंवाधार बरसणारा पाऊस, रोरावत वाहाणारा बेफान वारा, कडय़ावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, ओढय़ा नाल्यांचा खळखळाट, बिबटय़ांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, पशुपक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्ग संगीत एकतच ठकाबाबा लहानाचा मोठा आणि आता वृध्द झाला. जंगलात गुरे चारायला गेल्यानंतर पशुपक्षांचे आवाज सभोवतालच्या नीरव शांततेत कानावर पडल्यावर तसेच आवाज काढत प्रतिसाद देण्याची त्याला सवय लागली. त्यातूनच अनेक वन्य प्राणी पक्षांच्या हुबेहुब आवाजाचे कौशल्य ठकाबाबाने लीलया आत्मसात केले. परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांपासून तर थेट दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत अनेकांनी त्यांच्या या कलेची प्रशंसा केली. पण या कोरडय़ा कौतुकाने त्यांच्या पदरात काही पडले नाही.
ही कला व पारंपारिक नृत्याच्या जोरावर ठकाबाबांनी दिल्लीपर्यंत धडक मारली. सन १९६५ च्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकाने सन्मानीत करण्यात आले, या पथकात ठकाबाबांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या इच्छेने काही हवे असल्यास देण्याचे आश्वासनही मिळाले होते. परंतु भोळयाभाबडया आदिवासांनी लालबहादूर शास्त्री व इंदिराजी गांधी यांच्या भेटीचेच समाधान मानले.
हरहुन्नरी ठकाबाबा वयोमानानुसार आता थकले आहेत. त्याचा परिणाम प्रामुख्याने त्यांच्या या कलेच्या हुन्नरवरच झाला आहे. त्यातील नैसर्गिक धार कमी झाली आहे. या वयात किमान जगण्याची सोय असावी ही माफक अपेक्षा ते बाळगून आहेत. मुलाच्या नोकरीची त्यांची अपेक्षा खुप तीव्र होती परंतु ती अपुर्णच राहिल्याची खंत ते व्यक्त करतात. चार मुलांपैकी एक मुलगा सखारामला काही कला येतात. पाच वर्षांंचा नातू यशवंतही आता पक्षांचे आवाज काढू लागला आहे.
मंत्री, संत्री, मोठे अधिकारी अशा अनेक उच्चपदस्थांनी ठकाबाबाची पाठ थोपटली, माहितीही नेली, कलाकार मानधनासाठी प्रयत्न करु असे आश्वासनेही दिली, परंतु ही आश्वासने व वाहवा अल्पजिवीच ठरली. सादरीकरणाला दाद देत काही जाणकारांनी थोडीफार आर्थिक मदतही केली, मात्र त्याने ठकाबाबाच्या आयुष्याचा प्रश्न काही सुटला नाही.
आयुष्याच्या संध्याछाया आता खुणावू लागल्या आहेत. एक आदिवासी कलाकार म्हणुन शासनाकडून व आदिवासी विभागातून थोडीफार आर्थिक मदत मिळावी, निवृत्तीवेतन मिळावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे, परंतु ती फलद्रुप होईल की नाही याबाबत साशंकताच दिसते.
No comments:
Post a Comment