Wednesday, 6 March 2013

बोलांचा सुस्पष्ट निकास, तालाची शास्त्रीय बैठक आणि तीन घराण्यांच्या कायद्याची अभ्यासपूर्ण मांडणी करुन तबल्याच्या जादुई बोलाने तालयात्री नाहुन निघाले.
येथील पार्वती मंगल कार्यालयात तालयात्री संस्थेच्या वतीने आयोजित स्व.अन्नू भोसले स्मृती संगीत समारोह प्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबला वादक पं.रामदास पळसुले यांचे तबला वादन झाले.
मैफलीच्या प्रारंभी फरुखाबाद घराण्याचा पेशकार सादर केला. त्याबरोबर शास्त्रशुद्ध सोलो वादन रसिकांना चांगलेच भावले. त्यानंतर दिल्ली, लखनौ व फरोखाबाद या तिन्ही घराण्यांच्या कायद्याची केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीला रसिकांनी भरभरुन दाद दिली.
तबलावादनात तीन ताल हा सातत्याने वाजविला जाणारा ताल असूनही पं.पळूसले यांनी तेच ते वाजविण्याऐवजी अनवट जातीचे कायदे, बंदिशी व वेगवेगळ्या प्रकारच्या गती सारख्या रचना सादर करून परभणीच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. एक तास २0 मिनिट चाललेल्या या मैफलीत शेवटी सलग वाजविता येणारा बोलसमूह सातत्याने वाजवून रव (माहोल) तयार करणार्‍या अतिद्रूतगती लयीत ‘रेला’ सादर करताच टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला. पळसुले हे प्रख्यात तबलावादक तळवलकर यांचे शिष्य आहेत. त्यांच्यासोबत संवादिनीवर तन्मय देवचक्के यांनी तर तबल्यावर अभिजीत बारटक्के यांनी साथ दिली.
या मैफलीस तालरसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश चौधरी यांचे तबला सोलो वादन झाले. प्रारंभी सूरमणी डॉ.कमलाकर परळीकर, ज्येष्ठ विधीज्ञ अँड.वसंतराव पाटील, डॉ.संजय टाकळकर व पं.पळसुले यांच्या हस्ते स्व.अन्नू भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. किशोर पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. रवि देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संतोष दडके यांनी आभार मानले. मागील वर्षी याच कार्यक्रमात पं.अरविंदकुमार आझाद यांनी बनारस घराण्याचे दर्शन आपल्या तबला वादनातून घडविले होते.तालयात्री चे किशोर पुराणिक, रेणुकादास रत्नपारखी, शाम पैठणकर, प्रा. नितीन लोहट, रवी देशमुख, राम कोठेकर, विश्राम परळीकर, मंगेश चौधरी, संतोष दडके, मंगेश पांडे, प्रशांत जैन, विष्णू अयोध्यावासी, यमन शोभणे, समीर भोसले यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment