Wednesday, 27 March 2013

आपण आदिवासी व ग्रामीण भागातील आहोत हेच मनातून काढून टाका. मीसुध्दा सहावी पर्यंत आश्रमशाळेत शिकले. परंतु अशिक्षित आईने खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी भक्कम आधार दिल्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले. तुमच्यातही माझ्यासारखेच गुण आहेत, जिद्द व चिकाटी ठेवल्यास तुम्हालाही निश्चित यश मिळेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने केले.
राजूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्था संचलित कन्या प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पारितोषिक वितरण कविता हिच्या हस्ते आज झाले. यावेळी तिने उपस्थित आदिवासी मुली व खेळाडुंशी मनमोकळेपणाने संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हेमलताताई पिचड होत्या. प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्राचार्य ठकाजी कानवडे, एम. बी. वाकचौरे, आरोग्य संचालक डॉ. भानुदास शेंडे, उपअभियंता सचिन पवार आदी यावेळी उपस्थित होते.
पिचड म्हणाल्या, विद्यार्थीनींनी उच्च ध्येय ठेवून कविता राऊत, कल्पना चावला यांचे आदर्श घ्यावेत. गावाच्या विकासासाठी श्री समर्थ कन्या विद्यालय नेहमीच प्रयत्नशील व सहभागी असते. आदिवासी भागातील या विद्यालयाने अल्पावधीत प्रगती साधली.
संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी प्रास्तविक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. किरण भागवत यांनी सूत्रसंचलन केले.

No comments:

Post a Comment