Wednesday, 6 March 2013

मुला-मुलींना आपला जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे हा विचार आता पटतो आहे; पण प्रत्यक्षात आलेला नाही. हे स्वातंत्र्य कुटुंबानं, नजीकच्या समाजानं काही प्रमाणात र्मयादित ठेवलं आहे हे तर आजूबाजूला दिसेलच. पण तो विचार जसजसा पसरतो आहे तसतसा पालक-मुलं यांच्यामध्ये एक अडनिडा प्रदेश निर्माण होताना दिसतोय. त्याचा नकाशा प्रत्येक कुटुंबाचा वेगळा आहे. तो घरातल्या माणसांच्या संख्येवर आणि त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून असतो तसाच त्यांच्या बाह्य जगाशी असलेल्या/नसलेल्या, प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आंतरक्रियेमुळेही बदलतो. इतरही अनेक कारणं आहेत. खूप वैविध्य आहे त्यात. काहींनी त्यावरचा प्रवास सुलभ करण्यासाठी समन्वयानं काही मार्ग काढले, तर काहींना त्यावरच्या दर्‍याखोर्‍यांमधून वाट काढणं कठीण होतं आहे, तर काही अडलेल्यांना समुपदेशनाची/मार्गदर्शनाची गरज वाटते आहे.
आधी सकारात्मक गोष्टी बघू. समन्वयानं मार्ग काढणार्‍या कुटुंबांमध्ये संवादात सांगण्याइतकंच किंबहुना थोडं अधिक महत्त्व ऐकण्याला, ऐकून घेण्याला असतं. विशेषत: जे मुद्दे आपल्याला पटत नाहीत ते अधिक नीटपणे ऐकून घेण्याला असतं. इथे मुलं आणि पालक आपापलं म्हणणं मांडतात आणि एकमेकांचं ऐकून घेतात. अर्थातच हे काही नेहमी कॉन्फरन्स बोलावून घडत नाही. (तेही करावं लागतं कधी कधी) बालपणापासूनच हे घडत असतं. कधी नात्यात, मित्रमैत्रिणींत, आसपास कुणाचं लग्न ठरतं, मोडतं, ठरत नाहीये याची काळजी व्यक्त होते. त्या निमित्तानं घरात चर्चा होतात. कधी चित्रपट, टीव्ही, वृत्तपत्रातील बातमी चर्चेला कारणीभूत होते. समाजातील वाईट प्रवृत्तींसाठी किंवा वाईट बातम्या जास्त प्रमाणात देऊन समाजमानस नकारात्मक करण्याबाबत जेव्हा आपण या माध्यमांना जबाबदार धरतो तेव्हा हीच या माध्यमं आपल्या विचारांना, चर्चांना चालना देतात, माहीत नसलेलं; पण प्रचलीत होत चाललेलं काही आपल्यापुढे मांडतात हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात, हा उपयोग डोळसपणे करायला हवा.
अगदी न कळत्या वयातही मुलं प्रश्न विचारतात, पालकांना बुचकळ्यात पाडतात किंवा प्रश्न न विचारताही ऐकत-पाहत असतात. विवाहाच्या संदर्भात मुलांसमोर, मुलांबरोबर काय बोललं जातं, काय जात नाही हे महत्त्वाचं असतं. घरात आणि परिसरात कशा तर्‍हेचं सहजीवन मुलांना पाहायला मिळतं आणि त्यातून ते काय काय उचलतात, जपतात याचा अंदाज मुलांशी बोललं तरच घेता येतो. मुलांच्या वयानुरूप पालक मोकळेपणानं उत्तरं/प्रतिक्रि या देत गेले तर पक्के झालेले किंवा बदलते विचार एकमेकांना कळत राहतात. एका आईचा अनुभव बघू. मुलगा सोळा वर्षाचा असताना तो टीव्ही बघत असताना एकदा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या जोडप्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला. ‘कसलं काहीतरी दाखवतात’ असं न म्हणता ती त्याच्याबरोबर बघायला बसली. दोघांच्या सहज गप्पा झाल्या त्या दरम्यान. या नव्या पद्धतीविषयीची काही मतं सारखी, काही वेगळी आहेत हे कळलं. बाबा तिथे नव्हते म्हणून सवडीनं हा संवाद तिनं त्यांच्याही कानावर घातला. यातून तिला कळली त्यांची (लेटेस्ट) मतं आणि आई-मुलाच्या संवादाबद्दलची प्रतिक्रियाही. तिघांचा एकत्र किंवा सुटा, अधूनमधून हा सिलसिला असाच चालत राहिला. त्यामुळे तो मुलगा लग्नाला तयार होईतो घरातल्यांना एकमेकांची विवाहविषयक सर्वसामान्य मतं आणि त्याच्या लग्नाविषयीचे विचार, अपेक्षा, प्रत्येकानं द्यायचं योगदान, असल्यास आग्रहही बर्‍यापैकी माहीत झालेले होते. त्यात कुणाला किती, कसं स्वत:ला वळवून वाकवून घ्यावं लागेल त्याचा अंदाज होता. (या उदाहरणात मुलाऐवजी मुलगीही असेल, शिवाय आजी-आजोबाही असतील.)
मुलांचं एकूण व्यक्तिमत्त्व, त्यांचे विवाहविषयक विचार, अपेक्षा यांच्या घडणीला आता फक्त आपले संस्कार कारणीभूत नसतात, तर नजीकच्या समाजातल्या किंवा माध्यमांमुळे समोर येणार्‍या जगातल्या अनेक गोष्टींचाही प्रभावही कारणीभूत असतो, हे पालकांनी लक्षात घेण्याची खूप गरज आता दिसतेय. त्यांच्या आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या विचारांमध्ये आपल्याला धोके दिसत असतील तर ते दाखवून द्यावेतच. पण आपल्याला वाटणारे धोके त्यांना धोके वाटणार नाहीत किंवा तसे ते वाटले तरी इतर काही मिळविण्यासाठी ते पत्करण्याची त्यांची तयारी असेल. हेही शक्य आहे ना ? मुलांनी आपल्या करिअरमधले अडथळे, धोके निभावायला सक्षम असावं. करिअरमध्ये अधिक विकासाच्या, आनंद-समाधान मिळविण्याच्या संधी आत्मनिर्भर होऊन घ्याव्यात असं वाटत असेल तर ती त्यांचे विवाहविषयक निर्णय घ्यायलाही सक्षम आहेत, असं आपल्याला का वाटत नाही? याचा पडताळा आता प्रत्येक पालकाने घ्यायला हवा.
एका मुलीचा अनुभवही पाहू. मुंबईच्या परिघावरच्या भागात राहणारी, एका पारंपरिक विचारांच्या कुटुंबातली ही मुलगी. अगदी कर्मठ नसले तरी शक्यतो प्रथा, परंपरा न मोडणारे मध्यम आर्थिक परिस्थितीतले आई-वडील आणि अधूनमधून येणारे आजी-आजोबा. असं तिचं विश्‍व होतं अकरावीत जाईपर्यंत. शाळाही काळानुरूप फार काही न बदलता आहे तशी चालत राहणारी. टीव्हीमुळे चाकोरीबाहेरचं जग दिसायचं पण ते घरातल्या, शाळेतल्या वातावरणामुळे दूरस्थ वाटायचं. दहावीला चांगले मार्कमिळाल्यानं तिला मुंबईतल्या प्रतिष्ठित कॉलेजात आर्ट्सला प्रवेश मिळाला. इथे थोडासा संघर्ष झाला पालकांशी. त्यांच्या मते तिनं जवळच्या ज्यूनिअर कॉलेजात सायन्सला जावं आणि पुढे इंजिनिअरिंगला प्रयत्न करावा असं होतं. पण तिनं आपल्या आवडीचा आणि खर्चाचा मुद्दा लावून धरून आर्ट्सची निवड केली. या कॉलेजात तिच्या सुप्त गुणांना वाव मिळू लागला. वेगळे विचार ऐकण्याची, वेगळं काही करून पाहण्याची संधी मिळू लागली. ती अधिक समाजाभिमुख होत गेली. मला ही मुलगी भेटली तेव्हा तिचा लग्नाचा विचार चालू झाला होता. तेव्हाही पालक आणि ती यांच्या विचारात तफावत येत होती. परंतु एकमेकांचं ऐकून, समजून घेण्याची तयारी दोन्ही बाजूनं झालेली होती. त्यातलं तिचं योगदान अनेकांना उपयुक्त ठरेल. ‘आपल्याला जे नवं जग, जसं दिसतंय ते मी आई-वडिलांशी शेअर करत गेले. ओघानच माझे विचार, मतं, वागणं बदलतं आहे हेही त्यांना वेळोवेळी कळत गेलं. यांना काय कळणार असं न म्हणता मी माझ्यात होणारा बदल त्यांच्यापर्यंत पोचवत राहिले. काही पोचलं असेल काही नसेल; पण बदलाबद्दलचा संवाद राहिला. तुटला असता तर ते अडचणीचं ठरलं असतं.’
या संवादाचा फायदा लग्नाच्या विचाराच्या वेळी अधोरेखित झाला. तिचे सोशल वर्कमधले करिअर आणि त्याच फिल्डमधला नवरा निवडण्याचा विचार हे स्वीकारणं पालकांना सहज जमलं नसलं तरी अति अवघड झालं नाही. असे सकारात्मक अनुभव वेचत राहिलो तर जोडीदार निवडीचा मार्ग थोडा अधिक सुकर होईल नाही का? पण त्यामागे एक सूत्र नक्की आहे. प्रत्येकाचा विवाह करणं आणि निभावणं वेगळं असतं. काही गोष्टी समान असल्या, खूप बदलल्या नसल्या तरी ‘त्यांचं आणि आपलं सेम टु सेम नसतं’ हे पालकांनी लक्षात घ्यायलाच हवंय, नाही का?

No comments:

Post a Comment