Saturday, 30 March 2013

रानमेव्यातून कमाई, पर्यटकांवर मोहिनीही!
राजूर,  १ एप्रिल /वार्ताहर    डोंगरची काळी मैना बाजारात आली
डोंगरदऱ्यात दडलेला करवंदे, कैऱ्या, गाळवे तसेच जांभळांचा रानमेवा गोळा करून आदिवासी मुलांकडून त्याची विक्री होत आहे. डोंगरची मैना काळी मैना तीन रूपयांना आठवा अशी हाक कानी पडताच हा मेवा खरेदी करण्यासाठी शौकिनांची गर्दी होते.अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात उन्हाळ्यात रोजगारासाठी भटकंती सुरू असते. आदिवासी वाडय़ा-पाडय़ातील लहान मुले सुट्टीत खेळण्याचा आनंद लुटण्याऐवजी काटेरी झुडपांमध्ये दडलेले करवंदांचा खजिना धुंडाळण्यात वेळ घालतात. सकाळी सातलाच हातात छोटय़ा टोपल्या घेऊन करवंदे, जांभळे, कैऱ्या, गाळवे वगैरे गोळा करून रस्त्यावर फिरून मोठय़ा आवाजात ओरडून ही मुले या मेव्याची विक्री करतात. अशा प्रकारे दिवसभरात शंभर रूपये कमाई करतात.
राजूर, भंडारदरा, कोतूळ, समशेरपूर आदी भागात सध्या हे चित्र पाहावयास मिळते. संतोष झडे, हौसाबाई परते या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलांनी या विक्रीतून होत असलेल्या फायद्याचा विनियोग आम्ही शिक्षण, कपडे, गणवेश, वह्य़ा-पुस्तके, घरखर्चासाठी करीत असल्याचे सांगितले. पर्यटकांचा या मुलांना चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांचे धीट बोलणे व दोन-तीन रूपयांत आठवाभर रानमेवा हे शब्द पर्यटकांना मोहिनी घालतात. सुट्टीतल्या आनंदापेक्षा जीवनाला नवा आकार-उकार देण्याचे हे प्रात्यक्षिक जास्त महत्त्वाचे व मोलाचे, तसेच अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया चौकस पर्यटक आवर्जून व्यक्त करतात. उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावनाही काहीजण बोलून दाखवितात.

रानमेव्यातून कमाई,

रानमेव्यातून कमाई,

No comments:

Post a Comment