Thursday, 14 March 2013

नीलिमा मिश्रा

अंगुठाछाप बायका. ‘यांना हिशेब काय कळणार?’ पण उत्तर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील याच हजारो महिलांनी आपली आणि आपल्या गावची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसवली. महिलांसाठी स्वतंत्र बँक प्रस्तावित असताना महिलांच्या या प्रवासात त्यांची सक्षम साथ करणार्‍या अनुभवाविषयी सांगताहेत ‘मॅगेसेसे’ पुरस्कार विजेत्या

बाई सुशिक्षित असो की अशिक्षित, शहरी असो वा ग्रामीण तिच्यात व्यवहार करण्याची बुध्दी, ताकद व ‘पोटेन्शियल जन्मतच असते. त्यामुळेच तिला कोणताही व्यवहार हुशारीनं, नेमकेपणानं करणं सहज जमतं. ग्रामीण भागातल्या बायकांचा विचार केल्यास बायकांची ही हुशारी वापरण्याची संधीच त्यांना मिळत नाही. चूल-मूल सांभाळण्यापासून ते शेतात पुरूषांच्या बरोबरीनं काम करण्यापर्यंत बाईचा सहभाग असतो. पण कष्टानं पिकवलेला माल बाजारात कोणत्या भावानं विकला? किती पैसे आले? खिशात जर एवढेच उरले तर ते का? बाकीचे कुठे गेले? हे विचारण्याचा तिला हक्कच नव्हता. हा हक्क नसल्यानं आर्थिक व्यवहाराची संधी नव्हती, संधी नव्हती म्हणून अनुभव नव्हता आणि अनुभव नव्हता म्हणून प्रत्यक्ष तिच्यातली हुशारी दाखवण्याची तिला संधीच मिळाली नाही म्हणजे फिरून मुद्दा संधीकडेच आला. आणि मी माझ्या कामातून ग्रामीण भागातल्या माझ्या महिला सहकार्‍यांना ही संधी उपलब्ध करून दिली.
मी काम सुरू केलं तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर गाव विकासाचा आदर्श उद्देश होता. पण या विकासासाठी मला महिलांना आत्मनिर्भर करायचं होतं. ग्रामीण भागातली किंवा कुठलीही स्त्री आत्मनिर्भर होणं म्हणजे आर्थिकदृष्टया सबळ होणं. त्यांच्या या आर्थिक सबलीकरणाला आरोग्य, शिक्षण असे अनेक आयाम जोडलेले आहेत. महिला आर्थिकदृष्टया सबळ होवू लागल्या की त्या स्वत बदलतात. त्यांच घर बदलतं आणि हळूहळू त्यांचं गावही कात टाकतं. पूर्वी घरातल्या एका बाईच्या शिकण्याला संपूर्ण घराच्या शिकण्याचा संदर्भ लावला जायचा. तसंच बाईचं आर्थिकदृष्टया सक्षम होणं हे संपूर्ण गावाशी जोडलेलं आहे.
घरातली कोणतीही अडचण, कोणतंही संकट बाईला खोलवर जाणवतं. ते सोडवण्यासाठी तीच आधी पुढाकार घेते. ती प्रयत्न करते. बाईच्या या वृत्तीचा फायदा मी काम सुरू करतांना घेतला. म्हणूनच ‘मी तुम्हाला सबल करते, तुमचे प्रश्न सोडवते’ अशी भूमिका मी घेतली नाही. मी फक्त माध्यम बनले. महिलांना त्यांच्या-त्यांच्या गरजा घेवून माझ्यापर्यंत येण्याचा आग्रह ठेवला. मला हे स्पष्ट दिसत होतं की महिलांच्या आर्थिक हुशारीची पाटी कोरी आहे. आणि त्यांना संधी नसल्यानं ती तशी आहे. पण त्यांना आयतं आर्थिक कौशल्य कसं देणार? त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार आणि अनुभव घेणं महत्त्वाचं होतं.
माझ्या संस्थेच्या कामाविषयी माहिती मिळाल्यानंतर गावातल्या काही बायका माझ्याकडे आल्या. घरातल्या गरजा, डोक्यावरची कर्ज याविषयी बोलल्या. तेंव्हा मी त्यांना बचत गटाचं माध्यम दाखवलं. बायकांनी एकत्र येण्यातली ताकद दाखवली. आणि त्यासाठी नियमिततेचा नियम लावला. बायकांना ते पटलं. सर्व नियम मान्य केले आणि गावातल्या १४ बायकांनी प्रत्येकी २00 रूपये साचवत बचत गट सुरू केला. बायकांशी संवाद साधायला, त्यांना एकत्र करायला बचत गट हे उत्तम माध्यम वाटलं. कारण एकीला हाक दिली की एकदम २0 जणी यायच्या. मग बचत गटाचं लोण गावभर पसरायला लागलं. एकाच गावात अनेक बचत गट सुरू झाले. मग असं व्हायचं की एका गटाला हाक दिली की गावातले पाच सहा गट मिळून दोनशे बायका एकदम जमायच्या. त्यामुळे बचत गटाचे नियम प्रत्येकीपर्य.ंत एकदम पोहोचले.
बचत सुरू केल्यानंतर बायकांना प्रश्न पडला की आता काय करायचं? मी जर त्यांना आधीच एखाद्या उद्योगाचा पर्याय दिला असता तर त्यांनी प्रश्न विचारलेच नसते. शहाणपण येण्यासाठी प्रश्न पडणं ही पहिली पायरी आहे. पुढाकार घेणं, प्रयत्न करणं, अनुभव घेणं, अनुभवातून शिकणं, सुधारणं आणि करत राहणं हेच शिकण्याचे टप्पे असतात. याच टप्प्यांनी माझ्या महिला सहका-यांनी अंगी आर्थिक कौशल्य बाणवलं.
२८00 रूपयांच्या भांडवलातून पदार्थ बनवण्याचा उद्योग सुरू केला. मग पुन्हा त्यांना प्रश्न पडला की आता या पदार्थांचं करायचं काय? मी त्यांना स्टॅाल्स मांडण्याचा पर्याय दिला. आधी त्या घाबरल्या, संकोचल्या. पण धीरानं त्यासाठी उभ्या राहिल्या. त्या स्टॅाल्सच्या माध्यमातून त्या महिलांच्या हातात पहिल्यांदा पैसा खुळखुळला. त्या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत या बायकांनी येणा-या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला. आणि त्यांना आर्थिक व्यवहाराचा ताळमेळ जमला. प्रशिक्षण महत्त्वाचं, पण नुसत्या प्रशिक्षणाचा काहीच उपयोग नाही. प्रशिक्षणातून अनुभव मिळतच नाही. आणि एकदा का अनुभव मिळाला की प्रशिक्षणाची गरज उरत नाही.
काहीतरी शिकण्याची आणि करण्याची बायकांना एकदा का संधी मिळाली की त्यांना सतत काहीतरी करण्याचे, शिकण्याचे डोहाळे लागतात. मग या बायकांनी संगणक शिकण्यातही पुढाकार घेतला.
सुरूवातीला बचत गटाच्या बाबतीत महिला उदासिन होत्या. या माध्यमातून त्यांची फसवणूक झाली होती, पैसे बुडाले होते. एकूण काय तर तोंड पोळलं होतं. पण ते बचत गट अयशस्वी होण्याची कारणंही त्यांच्यातच दडली होती. संवाद, नियमितता, एकत्र येण्याचा अभाव यामुळे हे सर्व घडलं होतं. हे समजून सांगितल्यावर त्यांना ते पटलही होतं. म्हणूनच बचत गटांना सक्षम करण्यासाठी महिलांचे मेळावे घेतले. एकत्र येवून विचारांचे, अनुभवांचे आदान-प्रदान करण्याची, संवादाची संधी दिल्यावर महिलांमधूनच अनेक कल्पना पुढे आल्या. पदार्थ, साबण, केरसुण्या, फिनाईल असे कितीतरी पर्याय महिला मांडत होत्या. त्याच त्यावर वाद घालत होत्या. परत त्यातून त्यांना रूचेल-पटेल असे पर्याय काढत होत्या. ज्या गोधड्यांमुळे आमचा ‘भगिनी निवेदिता गट’ आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून पोहोचला तो गोधड्या बनवण्याचा व्यवसाय बायकांच्या याच चर्चेतून उभा राहिला. जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला जमते तेच करावे यावर माझा आणि नंतर माझ्या सहका-यांचाही विश्‍वास बसला. या व्यवसायात प्रत्यक्ष उतरल्यावर बायकांना एकेक धडे मिळत गेले. भले त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली, पण भविष्यात उद्योग यशस्वीपणे चालविण्याचा धडा आम्ही सगळ्यांनीच नीट गिरवला. गोधड्यांचं एक मोठं प्रोजेक्ट एका पार्टीनं नाकारल्यानंतर आमच्या तयार गोधड्या तशाच पडल्या. पण बचत गटातल्या बायकांना, उद्योग व्यवसाय करत असलेल्या बायकांना माझं एक सांगणं असतं की कोणत्याही अपयशातून खचून मटकन खाली बसायचं नसतं. तर त्यातून शिकून नव्या उमेदीनं, ज्ञानाच्या ताकदीनं उभ राहायचं असतं. या अनुभवानं आपण जे करतो आहोत ते नीट आहे ना, योग्य आहे ना ते पारखून घेण्याची, व्यवस्थित अंदाज घेवून काम करण्याची आम्हाला सवय लागली. ब-याचदा बायकांचे उद्योग-व्यवसायात आर्थिक व्यवहार फसतात, चुकतात, फिस्कटतात. कारण बायका त्यांना जे जमतं ते करण्याऐवजी जे जमत नाही ते करण्याचं धाडस करतात. त्यातूनच ‘बायकांचा व्यवहार ना, मग तो फसणारच’ असा चुकीचा शिक्का बसतो.
चुका प्रत्येकाच्याच होतात, पण त्यातून शिकलं पाहिजे. आमच्या गावातल्या महिला बचत गटांनी तर पुरूषांचे बचत गट सुरू करण्याला केवळ प्रेरणाच दिली नाही तर ते टिकून राहण्यासाठी त्यांना सक्षमही केलं. त्यांना नियमांची सक्त ताकीद दिली. मग पुरूषांनीही शब्द दिला की, आम्ही बचत गट नीट चालवू. घेतलेलं कर्ज वेळेवर फेडू.
महिलांच्या बचत गटामुळे मग गावातले एकेक घटक जागरूक झाले. पुढाकार घेवून कार्यान्वित झाले. पुरूषांचे बचत गट, शेतक-यांचे बचत गट, युवांचे बचत गट सुरू झाले. त्यानंतर महिलांनी शिक्षणाचा मुद्दा काढला. ‘आमच्या मुलांना बालवाडीत फक्त पोषक आहार मिळतो, पण शिकायला काहीच मिळत नाही’ अशी तक्रार घेवून आल्यानंतर गावात शिक्षणावरही काम सुरू झालं. आता गावातील आरोग्य, स्वच्छता या महत्त्वाच्या मुद्यांनाही महिला हात घालत आहेत.
घरात पैसा आल्यावर घरातली माणसं बदलली. ते बायकांना समजून घेवू लागले. बायका आर्थिक व्यवहारात सक्षम झाल्या की त्यांची घरं सक्षम होतात हा अनुभव आज आमच्या गाठीशी आहे. या बायकांच्या घरात हळूहळू समजूतदारपणा, सहकार्य या वृत्ती झिरपू लागल्या.
पूर्वी गावातल्या बायकांचे विषय केवळ घरातल्या कटकटी, कजाग सासूचे गा-हाणे यापर्यंतच सीमित होते. ते स्वाभाविकही होते. दुस-या कामांचा, विषयांचा व्याप त्यांच्यामागे कुठे होता? आज गावात चार महिला रस्त्यावर कुठेही जमोत त्यांच्यात गप्पा रंगलेल्या असतात त्या फक्त पैशाच्या उलाढालीच्या, हिशेबाच्या आणि आणखी काय काय करायचे त्याच्या. आपल्या आजूबाजूचं वातावरणं बायका आपल्याच हिकमतीनं कशा बदलू शकतात त्याचं हे एक उत्तम उदाहरण.
आज गावातल्या बायकांची बँकेत नियमित ये-जा असते. प्रत्येक व्यवहार त्या स्वत उभं राहून करतात. ज्या बँकेत आज त्या सहज जातात पूर्वी तसं अजिबात नव्हतं. बँकामध्ये गावातल्या बायकांना सहज प्रवेश नव्हता. कारण या बायकांचे व्यवहार छोटे-छोटे आणि बँकांचे व्याप मोठे. छोटी-छोटी कामं करण्यात बँका नाखूष असायच्या. मग सुरूवातीला त्यांच्यासमोर बँकेतल्या कर्जाचा पर्याय न ठेवता इतर सपोर्टिव्ह आर्थिक संस्थांची मदत घेतली. त्यातून मोठी उलाढाल उभी केली. आणि आज त्याच बँकांमध्ये महिलांचे मोठमोठे व्यवहार हाताळले जात आहेत.
कोणतेही आर्थिक कौशल्य अंगी बाणवतांना बायकांनी संयम बाळगावा हा सल्ला मी कायम देते. आज मी दोन महिने २00 रूपये गुंतवले म्हणजे मला तिस-या महिन्यात हजाराचा उद्योग सुरू करता येईल असं होत नाही. बचत ते उद्योग, उद्योग ते फायदा, फायदा ते बदल या मोठय़ा प्रक्रिया आहेत आणि त्यांना स्वतंत्र आणि पुरेसा वेळ द्यावाच लागतो. आणि त्यासाठी बायकांमध्ये संयम हवा. परिणांमांच्या फळाची घाई नको. गटातल्या बायकांचा परस्परांवर विश्‍वास हवा. एकमेकींना मदत करण्याची भावना हवी. आणि ही मूल्यं अंगी असतील, बायकांना प्रश्न पडत असतील, त्यांची प्रयत्न करण्याची इच्छा असेल, अनुभव घेवून शिकण्याची, चुकांतून उभं राहण्याची जिद्द असेल तर आर्थिक व्यवहाराची बाराखडी शिकणं अजिबात अवघड नाही. आणि हा काही फक्त ग्रामीण भागतल्या महिलांना आखून दिलेला अभ्यासक्रम नाही. हा कित्ता कोणत्याही परिघातल्या बायका गिरवू शकतात आणि आपली आर्थिक समिकरणं बदलू शकतात.

महिलांसाठी स्वतंत्र बँक
२0१३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र बँकेची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.
महिलांसाठी स्वतंत्र बँक ही ग्रामीण भागातल्या महिलांसाठी नोठी संधी आहे. महिलांना त्यांचे व्यवहार व्यापक करण्यासाठी त्यातून प्रेरणा मिळेल. यामुळे बचत गटांची शक्ती वाढू शकते. आताच्या बँक व्यवस्थेत बचत गटांचे छोटे छोटे व्यवहार हाताळणं बँकेला काहीसं जिकरीचं ठरतं. त्यातूनच बचत गटांचे प्रस्ताव नाकारण्याचे प्रकार होतात. काही करू पाहणार्‍या महिलांचा आत्मविश्‍वास त्यामुळे डळमळतो. महिलांची स्वतंत्र बँक अस्तित्वात आल्यास बचत गटांचे व्यवहार हाताळणं बँकाना सोप्पं जाईल आणि महिलांनाही अधिक काही करून पाहण्याची संधी मिळेल.

बचत गट- काय काळजी घ्याल?
१. बचत गटाला शास्त्रीय भाषेत स्वंय-सहायता गट असे म्हणतात. त्याचा सरळ सरळ अर्थ स्वतला मदत करणं असा होतो. ही मदत करतांना नियमिततेचे, पारदर्शकतेचे नियम पाळायलाच हवेत.
२. बचत गट सुरू केला म्हणजे कर्ज मिळायलाच हवं असा आग्रह करता कामा नये. नाही कर्ज मिळालं म्हणून बचत गटाची उपयुक्तता संपली असं म्हणून बचत गट बंद करू नये. त्यापेक्षा बचत गटाच्या बचतीचा गटातल्या महिलांसाठी कसा फायदा होईल हे बघायला हवं. अंतर्गत कर्जासाठी त्याचा उपयोग करावा.
३. बचत गट सुरू केला म्हणजे लगेच कर्ज, लगेच उद्योग, लगेच फायदा असं होत नाही. संयम ठेवावा लागतो. आणि तो खूप वर्ष टिकवून ठेवावा लागतो.
४. बचत गटातल्या प्रत्येक बाईचं म्हणणं, तिचे विचार, अपेक्षा, तिच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. एकमेकांनी एकमेकांवर विश्‍वास ठेवायला हवा.
५. बचत गटातून उद्योग सुरू करायचा ठरला तरी एकदम मोठी झेप घेवून न झेपणारा मोठा व्यवसाय निवडू नये. छोटे-छोटे, आवाक्यातले उद्योग करून बघणं, नुकसान झालं तरी खचून न जाता यशाची जिद्द ठेवणं महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment