Tuesday, 11 February 2014

भरारी घ्यायचीच असेल तर ती गरूडासारखी घ्या... जेणेकरून तुमच्याकडे पहाणा-याचीसुद्धा मान उंचावेल
माझे सर्व शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंतचे संगमनेरलाच झाले. बालवाडी काटोल, नागपुरला तर चौथीपर्यंत नंतर संगमनेरला आणि नंतर ५वी ते बारावीचे सायन्सचे शिक्षण सह्याद्री विद्यालय व महाविद्यालयातच झाले.
माझे शिक्षण तसे बीएच म्हणावे लागेल.त्याआधी मी मर्चंट नेव्ही मध्ये रेडिओ ऑफिसर म्हणून काम केले होते. तेव्हडे माझे टेक्निकल शिक्षण मात्र, बुद्धीचातुर्याबरोबरच मनाच्या गोडव्याची उपजत शक्ती.  कोणत्याही कामाला कमी न लेखता कष्ट, प्रचंड मेहनत, धाडसी स्वभाव, जोखीम पत्करण्याची तयारी, या उद्योजकतेच्या गुणांचा अवलंब करून येथे आर्य करियर अकॅडमीची सुरवात केली.. माझ्या ह्या जिद्दीमुळे  इतरांनाही प्रेरणा  मिळेल अशी मला आशा आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसानेदेखील जगावर राज्य करावे अशीच माझी ईच्छा आहे.
बारावीनंतर मी बीएसस्सीला प्रवेश घेऊन ग्रॅजुएशन करून पोलिस उपनिरिक्षक ह्या पदासाठी प्रयत्न करण्याचा विचार करत होतो. त्या काळात संगमनेरला एमपीएससी/ युपीएससीचे कोणतेचा वातावरण नव्हते. पोलिस उपनिरिक्षक कसे व्हावे हेच मला माहित नव्हते. फक्त नाशिकला एक संस्था आहे आणि त्या ठिकाणी दोन वर्षे घासले तर आपण ही परिक्षा पास करू एव्हडेच माहित होते. पोलिस उपनिरिक्षक होण्यासाठी सदृढ तब्येत लागते हेच मला माहित होते आणि तसाही स्पोर्टसमध्ये मला सुरूवातीपासूनच आवड होती. असेच एकदा एका वृत्तपत्रात बातमी वाचली... “कमवा ४०००० ते ६००००” मर्चंट नेव्ही जॉईन करा... इंडियन मराईन कॉलेज, हैदराबाद.... ती जाहिरात कशाची होती ह्याचा मी त्यावेळी शोधही घेतला नाही आणि मर्चंट नेव्ही म्हणजे काय हेही त्यावेळी मला माहित नव्हते. संगमनेरातील काही लोकांकडे चौकशी केली तेव्हा व्यापारी जहाजांवर नौकरीची जाहिरात आहे हेच मला समजले. काही होवो जहाजावर नौकरी करायचीच. आणि सगळ्यात महत्वाचे लहानपणापासून जग पहाण्याची इच्छादेखील अगदी फुकट पुर्ण होईल हा विचार.
             पैसा ही गोष्ट आयुष्य जगण्यासाठी किती महत्वाची आहे आणि पैसा काय चीज आहे हे पहिल्यांदा कळले. हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती त्यावेळी बेताचीच होती असे म्हणावे लागेल. बहिणीचे लग्न नुकतेच झालेले त्यासाठी वडिलांनी कुठे कुठे कर्ज काढले होते ते त्यांनाच माहित त्यात भावाचा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला होता. त्यात माझा हैदराबादला जाण्याचा निर्णय.. घरात वेगळेच वातावरण झाले. जाहिरात पाहून अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्याच. शेजारच्या काकूंनी तर सरळ सांगितले की ६० हजार पगार राष्ट्रपतीलाही नाही ह्याला कोण देणार. म्हणजेच “झालो यशस्वी तर जिंकलो अन्यथा बरबादी” परत चान्स नाही... मुळातच सर्व मित्र इंजिनियरिंग/डॉक्टरला गेले असतांना व उरलेले बीएसस्सी करत असतांना असा विचित्र निर्णय म्हणजे काहीतरी जगावेगळंच होतं माझ्यासाठी नि जगासाठी. निर्णय घेतला होता. पन्नास रू पाठवून ब्रोशरही आले नेमके श्रावणात तिस-या सोमवारी देवाचा कौल समजुन जाण्याचा निर्णय घेतला व जगाविरूद्ध किंवा प्रवाहाविरूद्ध जाण्याचाच तो निर्णय होता माझ्यासाठी. “मध्यमवर्गीयांनी जणू मोठे स्वप्नच पाहू नये” असाच काही प्रकार माझ्या नातेवाईकांसाठी होता. निर्णय तर घेतला पण पैश्याचे काय. परिस्थिती हालाखीची? तेव्हा आई पाठिशी ठामपणे उभी राहिली. दागिण्यांवर आईचे जिवापाड प्रेम त्यात आधीच बरेचसे गहाण पडले होते उरलं सुरलं मंगळसूत्रही माझ्यासाठी गहाण टाकलं आणि मला पाठवलं हैदराबादला. तिथे फी भरली व होस्टेलला राहण्याची व्यवस्था वडिलांनी केली. तेव्हडी एकमेव भेट वडिलांची हैदराबादला. आणि ते निघून गेले. जेमतेम खाणावळ आणि रूमचे भाडे भरेल एव्हडे पैसे देऊन.
            कमी पैश्यात कसे दिवस काढायचे आणि असलेल्या पैश्यात वेळ कशी मारून न्यायची ह्याचे खरे ज्ञान आले होस्टेललाच. काही दिवसांत होस्टेलही सोडण्य़ाचा निर्णय घेतला व रूमवर गेलो... धाडसी निर्णय घेणे म्हणजे काय हे पहिल्यांदा अगदी अश्या किरकोळ गोष्टींतून शिकलो. तसेच “एकदा निर्णय घेतला की जे होईल ते होईल परत माघार ह्यायची नाही अशी शिकवणही अश्याच छोट्या अनुभवांतून शिकलो. होस्टेल सोडले नि  २० किमी अंतरावर रूम घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला. मुर्खपणाचे निर्णय नंतर कसे त्रासदायक ठरतात हे १९९३ च्या बाबरीमस्जिद दंगलीत लागलेल्या कर्फ्यूत समजले. जिथे सुविधा असतील तिथेच राजधानी असावी हेही ह्या प्रसंगातून शिकले व आजही व्यवसायात निर्णय घेतांना विशेषतः जागा निवडतांना खुपच अनुभव येत असतो. व्यवसायातील निर्णक्षमता व स्टॉप लॉस ही अर्थशास्त्रातील संज्ञा ह्याचे प्रत्यंतर चुकीच्या निर्णय घेतल्याने पैसे वाचतच नाही उलट जास्त जातात अश्यावेळी पटकन निर्णय घेऊन ती दुरूस्ती करावी ह्याचे शिक्षण त्यातूनच मिळाले आणि कंपनी डबघाईला जाणे म्हणजे काय तसेच बॅंकरप्ट होणे म्हणजे काय हे विद्यार्थीदशेतच कमी पैश्यात दिवस काढल्याने शिकलो.
            कमी पैश्यात वेळ मारून नेण्यासाठी एका ४रू थाळी असलेल्या हॉटेलमध्ये दुपारी जेवण तर संध्याकाळी मेसमध्ये जेवण करायचो. कधी कधी पैसे नसले तर चहा पिऊन भूक मारायचो.
            इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतल्यावर ६०हजाराची नौकरी मिळेल व सेटल होऊ असे वाटले होते... पण ते एव्हडे सोपे नाही हे सिनियर विद्यार्थ्यांना भेटल्यावर कळले.... ती परिक्षा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होती व तिचा निकाल केवळ १-२% लागतो हेही समजले. हे सर्व ऎकूण पायाखालची जमीनच सरकली... बापरे ...! मी तर एकदम सामान्य बुद्धीचा विद्यार्थी.... त्यात डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन इंजिनियरिंग लेव्हलचा तीन वर्षाचा अभ्यासक्रम केवळ १ वर्षात पुर्ण करायचा???? कुठून आलो आणि फसलो असं झालं. त्यात दुसरी बातमी आली... की रेडिओ ऑफिसर हे पदच रद्द करण्यात येणार आहे आणि त्याबदल्यात जीएमडीएसस हा अभ्यासक्रम येणार आहे आणि त्यासाठी जहाजावर कोणत्या स्पेशल व्यक्तीची गरज पडणार नाही. जबरदस्त टेन्शन आले. घरी फोन करून अंदाज घेतला. आईने “चिंता” व्यक्त केली पण वडिलांनी जे होईल ते होईल कर पुढचं पुढं बघू.... असं म्हटल्याने जबरदस्त चिंता वाटली.... कारण एकतर अभ्यासक्रम अवघड त्यात घरी फेकलेले ब्रम्हास्त्राचा काहीच फायदा झाला नाही.. फुसकाच निघाला....! पण चुकीचा निर्णय जरी असला तरी कधीकधी तो निर्णयही फायद्याचा ठरू शकतो हे मी हैदराबादच्या चुकीच्या त्या निर्णयामुळेच शिकलो.


           
            आता पर्याय नव्हता... “ जेव्हा मनुष्य आपल्या आयुष्यातील सर्व पर्याय सोडून देतो व आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करतो तेव्हाच तो ख-या अर्थाने यशस्वी होतो” ह्या वाक्याचे प्रत्यंतर नकळतपणे आले. घरी तोंड दाखवायला जागा नव्हती म्हणून झक मारून अभ्यास सुरू केला. जरी रेडिओ ऑफिसर पद रद्द झाले तरी मी डिग्री घेऊनच घरी जाईल मग पुढे होईल ते होईल..! एकदम जोमाने अभ्यास सुरू केला. अवघड होता तरीदेखील आपण त्या २ टक्क्यात यायचेच व जगाला तोंड दाखवायचे असेच ठरवले. “जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश येतेच” ह्याचे प्रत्यंतर मला तेव्हाच आले. १६-१६ तास अभ्यास करायचो. झोप लागेल म्हणून जेवणही करत नव्हतो. चहा दिवसाला २० कपापर्यंत प्यायचो. अगदी पोटात अल्सर झाला. पण अभ्यास सोडला नाही. झोपेचे यंत्र माझे त्याच काळात बिघडले असे मी मानतो आजही मी रोज सकाळी ४ वाजता झोपतो व १० वाजता उठतो आणि ही सवय मला त्यावेळी लागली. पहिल्या फटक्यातच लेखी परिक्षा पास केली. काही टक्यांमध्ये मी होतो. पोटात अल्सर घेऊन केरळला गेलो तिथे मुख्यची तयारी एर्नाकुलमला केली. अभ्यास एव्हडा खास झाला नव्हता. पण ठिक होता.... परिक्षेला तिथून चेन्नईला गेलो. परिक्षेला हालात खराब होती. पण शेवटी परिक्षा पास केलीच... “जर तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून मागितली तर ईश्वर ती गोष्ट तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत देतोच” ह्याचे प्रत्यंतर निकालानंतर आले सर्व भारतातून केवळ आम्ही ३०जण पास झालो होतो.
            मी प्रवेश घेतला तेव्हा १२०० विद्यार्थी होते. रेडिओ ऑफिसरचे पद रद्द होणार ही बातमी कळाल्यावर जेमतेम १०० विद्याथीच हैदराबादमध्ये उरले होते आणि त्यापैकी आम्ही जेमतेम १०-१५ क्लासला बाकीचे घरी तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून हैदराबादमध्ये छोट्यामोठ्या नौक-या करू लागले. ते आहे तेव्हडाच एकमेव सहारा होता. शेवटी आमचे इंडियन मराईन कॉलेजही बंद पडले आणि त्याला कुलूप लावण्यास मदत करायलाही मीच....!
            मुंबईत नौकरी शोधायला गेलो. गिरगावला एका चाळीत नातेवाईकाच्या घरी आईने व्यवस्था केली. तिथे जातांना आधी वेश्या वस्तीतून जावे लागायचे नंतर प्रचंड घाणीतून मग स्वच्छ घर. त्यांनी चांगली काळजी घेतली. मुंबईत एकच काम रोज सकाळी नौकरी शोधायला जाणे. सर्व मुंबई पालथी घातली. मंत्री संत्रीही झाले. पण नौकरी काही मिळेना. रोजचे जेवण असायचे झुणका भाकरी केंद्रातच कारण तोच एकमेव स्वस्त पर्याय होता. कपडे देखील कोणते तर २०-२० रूपयांचे रस्त्यावर मिळणारे शर्ट आणि पॅंट. लोकलमध्ये धक्के रोजच खाणे. आणि स्टेशन चुकले की परत पुढे जाऊन मागे येणे. वैताग येत होता. पण “ईश्वर तुमची परिक्षा पहातो व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश हे येतेच” ही गोष्ट मला मुंबईने शिकविली. वर्षभर मुंबईत १५०च्यावर कंपन्या फिरल्यानंतर शेवटी अचानकपणे मला सिंगापूर बेस्ड कंपनी टॅंकर पॅसॅफिकचा कॉल आला. बाकीच्या मित्रांना एव्हाना छोट्या मोठ्या कंपन्या मिळाल्या होत्या आणि मला डायरेक्ट सिंगापूरचा कॉल. थेट सिंगापूरला पोहचलो तिथून द. कोरिया व तिथून जॉईन केले जहाज... ते होते पहिले इस्त्रायली जहाज आणि त्यात मी एकमेव भारतीय.. माझ्या आयुष्यात ब-याच काही चांगल्या - वाईट गोष्टी मी माझ्या पहिल्या आणि दुस-या जहाजावरच शिकलो आणि नौकरी किती वाईट असते हे देखील. ते जहाज होते झिम अड्रियाटिक आणि माझे मित्र होते माझ्या वयाचे इस्त्रायली मुलं. पगार कमीच होता आणि खर्च जास्त. भारतीयांना इस्त्रायलींपेक्षा पगार कमी होता. पण असो काही असो जग पहायला मिळत होते. आणि राहिला खर्चाचा प्रश्न तर आम्ही चीनला बुट, सायकली व ईतर वस्तू स्वस्तात विकत घ्यायचो आणि युरोपमध्ये पाचपट किमतीत विकायचो. म्हणजेच २० डॉलरची सायकल आम्ही रोमला १०० डॉलरला विकायचो. ह्या सर्वाला स्मगलिंग म्हणतात हे मला फार उशीरा समजले.. मला पगार जरी ४०० डॉलर असला तरी स्मगलिंग करून मी १००० डॉलर एक्स्ट्रा कमवायचो. म्हणजेच त्यावेळच्या हिशोबाने माझा पगार होता ६४०००रू... आहे की नाही गंम्मत. पण नकळतपणे मी व्यवसाय शिकत होतो हे मला कळालेच नाही. कोरियात बार्गेनिंग करायचो आणि आमची ठरलेली आंटी होती तिच्याकडेच माल घ्यायचो. आंटीच्या फुल टिंगल्या करायचो. पण त्याच आंटीकडून अपमान सहन करूनही माल कसा विकायचा आणि झालेल्या टिंगल्यांचं रूपांतर पैश्यात कसं करायचो हे शिकलो ते असं की एका ट्रीपला मी दुसरीकडे माल खरेदी केला तेव्हा लक्षात आलं की आंटीने गोड गोड बोलून चांगलं गंडवल होतं ते.....! पण खुप काहि शिकलो त्या आंटीकडून आणि आणखी एक महत्वाचं शिकवलं मला तिने ते की व्यवसायात प्रामाणिकपण असावा. आणि सेवा उत्तम असावी नाहीतर आपले गि-हाईक तुटतात. इटालीत आम्ही जहाजावर येणा-या गो-यांना वस्तू विकायचो. गोड गोड बोलून. काहि प्रमाणात तिथली भाषाही शिकलो होतो. माझ्या चांगल्या सेवेमुळे मी ईतका प्रसिद्ध झालो होतो की माझे जहाज तेथील काही पोर्टवर जाताच ते लोक माझा शोध घेत घेत येत असत. काही वेळा भामटेगिरी करायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या गि-हाईकांनी माझ्या इस्त्रायली मित्र लिओरकडे माल खरेदी केला व त्या ट्रिपला मला नुकसानही सहन करावे लागले... “ व्यवसायात तुम्ही खरेच बोला” हे मी तिथेच शिकलो. आणि आजही माझा एव्हडा मोठा व्यवसाय संभाळतांना त्या “स्मगलिंग”च्या व्यवसायात आलेल्या अनुभवांचा फायदा होत असतो.
            २००१ ला काही अपरिहार्य कारणांमुळे कोणाला दिलेल्या वचनामुळे व पॉलिटिक्समुळे मी शिपिंग कंपनी सोडली. मग पुन्हा माझी फरफट सुरू झाली. पैसा काही वाचवला नव्हता. ओव्हरकॉन्फिडन्स नडला. काही दिवस नाशिकला सॉफ्ट्वेअर कोर्सेस केले. त्यातही मी व्हीबी/ओरॅकलमध्ये मास्टर झालो. अमेरिकन व्हिसा होता माझ्याकडे. पण अमेरिकेतील टॉवर पडले. माझे सॉफ्टवेअरमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले. पण त्या कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा आजही मला जबरदस्त फायदा होत आहे.  मग फरफट सुरू झाली. दुस-याच्या पैश्यावर जगण्याची वेळ आली. मुलगा झाला....! तो पण सरकारी इस्पितळात...! कारण परिस्थितीच नव्हती...! त्यावरून जवळच्या नातेवाईकांनी चांगलीच टर उडविली. हॉस्पिटलची बिलं वारंवार माझ्यासमोर फडकाविली. खुप अपमानित झालो होतो. खुप रडलो मी रस्त्यातून येतांना. एक टरमाळी गाडी होती माझ्याकडं तेव्हा. तिचे मडगार्ड किमान दहा तारांनी बांधलेलं होतो. गरीबीमुळे सहाजिकच मेंटेनन्स नावाला नव्हता. फॅमिली होती त्यात एक मुलगाही झाला त्याचे नाव आर्य ठेवले. नाशिकला एका झोपडीवजा घरात आम्ही राहत होतो. त्या घरात रात्री लाईट बंद केली की शेकडो उंदरं बाहेर येत असत. अंगावरूनही रात्रभर जात असत. शेवटी परत कोणाचा आधार घेतला व लहान बाळासाठी चांगल्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. नाशिकला मी काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट करून देत असे. त्याचवेळी पंडित कॉलनीत असतांना तिथे काही मुले एमपीएससीचा अभ्यास करत होती. आणि मग मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. पण फॅमिली असल्याने अभ्यास करता येत नव्हता. पण तरीही परिक्षा पास होत होतो. पण त्याच काळात एमपीएससी घोटाळा झाल्याने पाच वर्ष एमपीएससीच्या परिक्षांची जाहिरातच आली नाही. २००२ ला मी औरंगाबादला एका नातेवाईकाकडे गेलो त्याने मला पेप्सीची एजन्सी देऊ केली. सिडको विभागाची एजन्सी होती ती. त्यासाठी मी एक रिक्षा विकत घेतली. पैसे दिले नि रिक्षा आणली. त्याच रात्री त्या रिक्षावाल्याने रिक्षाची बॅटरीच चोरून नेली. रिक्षाची दुपारी पुजा केली. पुजा करत असतांना आर्य जोरात ओट्यावरून पडला. त्या गोष्टीचा माझ्या मनावर एव्हडा परिणाम झाला की मी निश्चयच केला आता आयुष्या मजा खुप झाली. माझ्या मुलाला मी एक चांगले आयुष्य देणारच आणि त्या दिवशीपासून पुन्हा एकदा निर्णय घेतला आता परत नौकरी करायची नाही करायचा तर व्यवसायच आणि त्यात एव्हडे यशस्वी व्हायचे की मी माझ्या मुलांसाठी सर्व सुखं खरेदी करेन. मी स्वतःच रिक्षा चालवायचो आणि माल विकायचो. १००-१०० पेप्सीचे जवळपास १० किलो वजनाचे कॅरेट रोज एकटाच चढवायचो व उतरवायचो. त्या व्यवसायात एव्हडा जम बसवला की मी दिवसाला १०० पर्यंत कॅरेट विकायचो व मला जवळपास दिवसाला १५०० रू मिळत असत. म्हणजेच महिन्याला ४५००० रू. व्यवसाय कशाला म्हणतात ह्याचे ज्ञान तोपर्यंत चांगलेच आले होते. पण त्यातच पेप्सी डिलर्स माल देण्यात भेदभाव करायला लागला. ग्रुप व्हायला लागले. माझ्या एरियात ईतर लोक माल विकायला लागले. व्यवसायातील गुपितं मी पाळू न शकल्यामुळे माझ्या आउटलेटमध्ये दुसरा माल विकायला लागला. तरी देखील मी नवीन नवीन आऊटलेट तयार केली, पण विरोधकांना ते पहावले नाही. त्यांनी ह्या ना त्या प्रकारे त्रास द्यायला सुरूवात केली.  शेवटी हातात पॉवर नसल्यास आपण कष्टाने उभा केलेला व्यवसाय कसा नष्ट होतो हे मी माझ्या डोळ्याने पाहिले. आणि निश्चय केला की परत जो व्यवसाय करेल तो पुर्णपणे माझा असेल आणि त्यात माझ्या बुद्धीने चालणारे प्रॉडक्ट असेल॥
            मग मी तिथेच उसाचा रस काढण्याचा व्यवसाय केला. त्यात जेमतेम पैसे मिळत असत. जेव्हा आपली परिस्थिती खराब असते तेव्हा चावणारे कुत्रे हात धुवून मागे लागतात ह्याचे प्रत्यंतर मी औरंगाबादला घेतले. माझ्या पेप्सीने भरलेली रिक्षा एकदा घर कम गोडावूनसमोर उलटली तेव्हा सर्वा ७० कॅरेट पेप्सी फुटली. ते नुकसान पाहून मी ढसाढसा रडायला लागलो. पण माझ्यावर कोणीच दया दाखवली नाही. साधे सांत्वनही कोणी केले नाही. खुप वाईट वाटले जवळ्पास १२००० चे नुकसान होते ते. त्यात जीवावर बेतले होते ते वेगळे. कामावरच्या पोरांनी कॅरेट परस्पर विकून घोटाळा केला तेव्हा समजले की “आपण एखाद्याला अगदी आपल्या पोरासारखे वागवा तो एक ना एक दिवस धोका देतोच”, “पैसा ही अशी गोष्ट आहे की ती चांगल्या चांगल्याला शत्रू बनवते”. तसेच झाले त्या पोरांना कामावरून काढले. नंतर व्यवसायही बंद झाला.....
            डोकं सरकलं अपयश पिच्छा सोडायलाच तयार नव्हतं. असं वाटायचं परत मुंबईला जावे नि नौकरी करावी. मधल्या काळात जहाजावर नौकरी नको असा बायकोचा हट्ट होता म्हणून बाहेर कंपन्यांतही प्रयत्न केला पण व्यर्थ.......! बायकोने त्या काळात खुप साथ दिली.  शेवटी औरंगाबादचा नाद सोडला आणि आलो परत संगमनेरला. परत दुस-याच्या जीवावर जगणे नशीबी आले. इकडून तिकडं उधारी करायची घरी पैसे मागायचे कसे बसे दिवस ढकलायचे. लोकांनी एव्हाना वेड्यात काढायला सुरूवात केली होती. मग मी माझ्या एमपीएससीच्या अभ्यासाचा फायदा करून घेऊन संगमनेरात अकॅडमी काढायचा निर्णय घेतला. रिक्षा विकली २५ हजाराला. वडिलांनी बॅंकेतून कर्ज काढून दिले. आणि सुरू केला व्यवसाय. खरेतर व्यवसाय सुरू करतांना माझ्याकडे ५ हजारच रूपये होते कारण बाकी पैसे उधारी देणे आणि रोजचे खर्च ह्यातच खर्च झाले होते. शेवट्चे ५ हजार रू होते जुगार खेळण्यसाठी. आणि मी जुगार खेळलो. नवीन नगर रोडला एक ४०० स्के.फुट हॉल घेतला. त्यात सुरू केली आर्य करियर अकॅडमी. सुरूवातीला पोस्टर लावणे जाहिराती करणे तसेच शिकवणे ही सर्व कामे मी एकटाच करत होतो. मुलांची मेस चालवणे. मुळातच पहिले अडमिशन होण्यासाठी १ महिना लागला. तोपर्यंत रोज ३०-४० चौकश्या व्हायच्या पण प्रवेश मात्र एकही नाही. उलट चौकश्या करणारे सहसा आर्मी एजंटांची लोकं होती आणि ती जातांना टिंगल्या करूनच जायची. पण माझी चिकाटी कामाला आली. आणि शाळेपासून स्पोर्टसमध्ये दाखविलेली आवड आणि कोणत्याही विषयाचा सूक्ष्म अभ्यास चांगलाच कामाला आला. पहिला प्रवेश झाला बेबी राऊत ह्या विद्यार्थीनीचा. आणि दुसरा झाला सानप म्हणून एका विद्यार्थ्याचा. बेबी एकदम अपटूडेट मुलगी तर सानप एक मनोरूग्ण. त्याच्या वडिलांनी त्याचा प्रवेश आठवड्याला ५० रू देऊ असे सांगून केला. तर बेबीच्या वडिलांनी १००० रू भरले होते. मग हळू हळू शिकवणे चांगले व उत्तम सेवा म्हणून आणखी विद्यार्थी आले. विद्यार्थी संख्या वाढली पण पैसे मात्र वाढले नाही. वेळप्रसंगी बायकोचे दागिने मोडले, गहाण टाकले. आईचेही गहाण टाकले. वडिलांनी कर्ज काढले पण गरीबी काही साथ सोडत नव्हती. त्यात बायकोचे सरकारी नौकरीसाठी निवड झाली. आणि काळही माझ्यावर हसला असेच म्हणावे लागेल ती नौकरीला गेली ती गेली पुन्हा माझ्याकडे परत न येण्यासाठी. एकीकडे गरीबी साथ सोडत नव्हती आणि दुसरीकडे जिवाभावाचे माणसंही सोडून जात होती. शेवटी मी तुटलो. मला दारूचे व्यसन लागले. मोठा दारूडा झालो. जेमतेम पैसा कमवायचो तो दारून उडवायचो. हालात खराब होती. बॅंकेकडून कर्ज काढून १००० स्क्वे.फुट गाळा घेतला होता. कर्ज होते १० लाख. ते फेडणे अवघड झाले. मर्चंट बॅंकेचे लोकं चकरा मारायला लागले होते. अकॅडमीत किती दिवस लाईटच नव्हती तेव्हा निलेश जोशी, बाळू पवार व स्वप्नाली शिंदे ह्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्री काढून वीज घेतली. परिस्थिती हालाखीची. पण सर्व दिवस सारखे नसतात. तरीही तुटलो होतो. अनेक प्रकारचे लोक त्रास देत होते आणि त्याला मी बळीही पडत होतो. जवळपास सर्वच गमावले होते. फॉमिली, पैसा, इज्जत नि प्रतिष्ठा. कोणताच मार्ग सुचत नव्हता. त्यात मुंबई पोलिस भरती झाली आणी माझे ३० पैकी २७ विद्यार्थी सिलेक्ट झाले. स्वप्नाली पीएसआय झाली. निकाल हातात होता. परिस्थिती पुर्ण बदलली होती. लोकांचा माझ्यावर विश्वास बसला होता. प्रवेश वाढले होते.
 मध्यंतरी कित्येकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. पण हिम्मतीने साथ दिली नाही. एकदा अशीच आत्महत्या करण्याची तयारी केली तेव्हड्यात काय डोक्यात आले कुणास ठाऊन दोन मिनिटे विचार केला की खिडकीतून एकदा जगाचे शेवटचे दर्शन तरी घ्यावे. खिडकी उघडली. दोन शेतकरी रस्त्यावरून मोटरसायकवर गेले. त्यानंतर एक जोडपं पायी गेलं त्या स्त्रीच्या खांच्यावर बाळ होतं पण ते गरीब जोडपं होतं, तरीपण जे जगत होतं. तेव्हड्यात एक चिमणी खिडकीतून माझ्या घरात घुसण्यासाठी धडपडत होती नवीन घरटं बांधण्यासाठी. डोक्यात विचार आला की, अरे जगात आपल्यापेक्षाही जास्त दुःखी माणसं आहेत तरीपण एव्हडं सगळं दुःख मनात ठेऊन जगतातच ना. ती चिमणीदेखील कोणीतरी घर मोडलं असेल म्हणून नवीन घर बांधायला उत्सुक आहेच ना. तिने त्याचं दुःख मानलं का? नाही ना...! तिने परत नव्याने आयुष्य जगायचा निर्णय घेतलाच असेल ना...! आयुष्य एकदाच जगायला मिळतं आणि प्राणीसुद्धा कधी आत्महत्या करत नाहीत किंबहूना त्यांना आत्महत्या करायची माहितीच नाही. मग तु का करतोस? निर्णय मागे घेतला. आणि आयुष्याचा सामना धैर्याने करायचा निर्णय घेतला. त्यानंतर केला सामना आयुष्याचा जे होईल ते होईल जगायचंच आणि मरण्याआधी काहीतरी मोठ्ठं करूनच मरायचं असाच एक निर्णय घेतला. शेवटी यशस्वीही झालो.
  
            अगदी शुन्यातून सर्व उभे केले होते. संगमनेरात अकॅडमी काढायचा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हा सगळ्यांनी मला अक्षरशः वेड्यात काढले होते. पण मी काहीही करू शकतो हा माझ्यात आत्मविश्वास होता. काही झाले तरी मी यशस्वी होऊ शकतोच ही माझी स्वतःबद्दलची कल्पना होती.  संगमनेर ब्रांचला ब-यापैकी यश आले होते विद्यार्थी संख्या शंभराच्यावर पोहोचली होती. माझे हे यश पाहून अनेकांना व्यवसाय करावासा वाटला जिथे एकही अकॅडमी नव्हती किंबहूना संगमनेरला असा व्यवसायच होऊ शकत नाही अश्या तालुक्याच्या ठिकानी तिथे आता तीन अकॅडम्या सुरू झाल्या. व आज सात संस्था कार्यरत आहेत.
            “आमची कुठेही शाखा नाही” हा शब्द मला नेहमीच संताप द्यायचा. अरे हे काय आपण मराठी माणूस अशी वाक्ये दुकानावर टाकून मोठेपणा गाजवतो त्यात कोणता मोठेपणा? मला संताप यायचा. मी विचार करायचो अमेरिकन उद्योगपती अमेरीकेत राहून भारतातील व्यवसाय हाकू शकतात तर मी माझ्या संगमनेरजवळच्या गावांतील व्यवसाय का संभाळू शकत नाही? आणि मग निर्णय झाला मी माझी पहिली ब्रांच नांदूर शिंगोटे(सुविधां अभावी गेल्या वर्षी बंद केली आहे) सुरू केली एका धाब्यामध्ये.  ती स्थिर होते न होते तोच दुसरी शाखा आळेफाटा सुरू केली, मग येवला, मग नाशिक, मग सटाणा, मग पुणे, मग नाशिक रोड, मग जुन्नर आणि लवकरच नवी मुंबई  नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात.

            प्रामाणिकपणे कष्ट करत गेलो. कर्जही फिटले होते एव्हाना. दुसरी मोठी जागा घेतली जवळपास संगमनेरला ४५०० स्क्वेफुट प्राईम लोकेशन जागा घेतली आणी यशस्वीपणे कर्जही फेडत आहे. आपली उत्तम सेवा हेच यशाचे गमक हे सुत्र पक्के डोक्यात ठेवले आणि विद्यार्थ्यांना दोन पैसे जास्त पण सेवा उत्तम हे सुत्र पट्वून दिले. स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. तुटलेला संसाराचा गाडा परत रूळावर आणला. पुन्हा लग्न केले. विशाखाने आयुष्या स्थैर्य आणले. घर शांत ठेवले म्हणुन बाहेर निर्णयही शांतपणे घेता आले. धाडसाने प्रत्येक पाऊल टाकले. हातात पॉवर ठेवली व डेअरिंग दाखविली त्यामुळे समाजकंटकांचे हलकट हल्ले सहज परतविण्याची ताकद आली. अनेकांनी अनेक प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न करून माझा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले अगदी सहजासहजी परतवून लावले. पैसा दिसायला लागला मग समाजकंटकांनी निरनिराळे प्रयोग सुरू केले. खंडण्याही मागितल्या. पोलिसांची नेहमीप्रमाणे मदत झालीच नाही. त्यांच्या निष्क्रियतेमुळे असली प्रकरणे आपल्या पद्धतीने निस्तरण्याची कला अवगत झाली. “तु मला मदत केली नाही म्हणून मी ते काम स्वतःच केले त्यामुळे ते शिकलो, त्याबद्दल तुझे धन्यवाद” ह्या उक्तीप्रमाणे  सर्वांचे धन्यवाद मानले आणि ह्यातूनच संकटांवर मात करण्याची कला शिकलो. प्रेम द्याल तर प्रेमच मिळेल हे व्यवसायिक संबंधांतून शिकलो. एकेकाळी दोघांना शिकविले आज माझ्याकडे १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे. व्यवसाय करतांना कधी कोणाला त्रास दिला नाही. कधी कोणाचा व्यवसाय ओढायचा प्रयत्न केला नाही. आज संगमनेरसारख्या ठिकाणी अहमदनगरपेक्षाही जास्त अकॅडम्या आहेत. जवळपास ७ संस्था कार्यरत आहेत. आणि खरोखरच माझ्यामुळे अनेकांना ह्या व्यवसायात रोजगार व आयडीया मिळाला आहे ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानास्पदाची गोष्ट आहे. यशस्वी होत असतांना अनेक चांगले वाईट लोक भेटले. महत्वाचे म्हणजे चांगले लोकच जास्त भेटले जसे आप्पासाहेब केसेकर, विष्णू भिंगारे, नवनीतशेठ कोठारी, जसपालजी डंग व भारतशेठ केसेकर ह्या सर्वांनी खुपच मदत केली. वेळोवेळी माझा आत्मविश्वास वाढविला. योग्य वेळी योग्य सल्ले दिले. काही विद्यार्थी जसे निलेश जोशी, बाळू पवार,स्वप्नाली शिंदे, वासिमा शेख, कैलास गुंजाळ, सुनिल फटांगरे, अमोल पानसरे, बटवाल, सतिष शिंदे  व मुग्धा जोर्वेकर आदींनी  जिवाला जीव दिला. अजुनही आयुष्यात खुप वाटचाल करायची आहे. साम्राज्य अजुन निर्माण व्हायचे आहे. महाराष्ट्राबाहेर जाऊन देशभरात व्यवसाय करायचा आहे मग जगभरात. परदेशी लोकांनी येऊन आपल्याकडे ब्रांचेस काढल्यात आपणही त्यांच्याकडे जाऊन व्यवसाय का करू नये? व्यवसाय कधीच स्थिर नसतो म्हणून आपण नेहमीच अस्थिर राहणे म्हणजे आपोआपच नवीन कल्पना येत राहतात. रोजच कल्पना येत असतात आणि त्या प्रत्यक्षात उतरविणे म्हणजेच व्यवसायातील नवीन प्रयोग व प्रयत्न असे मी मानतो.
            आज आर्य करियर अकॅडमी हि महाराष्ट्रातील क्रमांक १ ची संस्था आहे. गेल्या दहा वर्षात सात्यत्याने आर्यचे विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वप्रथम येत आहे. २०११ मध्ये तर १३ ठिकाणी आर्यचे विद्यार्थी सर्वप्रथम आले. एकेकाळी केलेल्या मेहनतीचे यश मिळायला लागले आहे. ५००० पेक्षा जास्त मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकारी नौकरी मिळवून देण्यास मदत केली. कित्येक मोफत शिबिरांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. सकारात्मक दृष्टीकोणाचे धडे विद्यार्थ्यांमध्ये गिरविल्याने विद्यार्थी आजच्या स्पर्धात्मक युगाच मोठ्या धीराने लढत आहे.
           

No comments:

Post a Comment