Tuesday, 11 February 2014

भरारी घ्यायचीच असेल तर ती गरूडासारखी घ्या... जेणेकरून तुमच्याकडे पहाणा-याचीसुद्धा मान उंचावेल
माझे सर्व शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंतचे संगमनेरलाच झाले. बालवाडी काटोल, नागपुरला तर चौथीपर्यंत नंतर संगमनेरला आणि नंतर ५वी ते बारावीचे सायन्सचे शिक्षण सह्याद्री विद्यालय व महाविद्यालयातच झाले.
माझे शिक्षण तसे बीएच म्हणावे लागेल.त्याआधी मी मर्चंट नेव्ही मध्ये रेडिओ ऑफिसर म्हणून काम केले होते. तेव्हडे माझे टेक्निकल शिक्षण मात्र, बुद्धीचातुर्याबरोबरच मनाच्या गोडव्याची उपजत शक्ती.  कोणत्याही कामाला कमी न लेखता कष्ट, प्रचंड मेहनत, धाडसी स्वभाव, जोखीम पत्करण्याची तयारी, या उद्योजकतेच्या गुणांचा अवलंब करून येथे आर्य करियर अकॅडमीची सुरवात केली.. माझ्या ह्या जिद्दीमुळे  इतरांनाही प्रेरणा  मिळेल अशी मला आशा आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसानेदेखील जगावर राज्य करावे अशीच माझी ईच्छा आहे.
बारावीनंतर मी बीएसस्सीला प्रवेश घेऊन ग्रॅजुएशन करून पोलिस उपनिरिक्षक ह्या पदासाठी प्रयत्न करण्याचा विचार करत होतो. त्या काळात संगमनेरला एमपीएससी/ युपीएससीचे कोणतेचा वातावरण नव्हते. पोलिस उपनिरिक्षक कसे व्हावे हेच मला माहित नव्हते. फक्त नाशिकला एक संस्था आहे आणि त्या ठिकाणी दोन वर्षे घासले तर आपण ही परिक्षा पास करू एव्हडेच माहित होते. पोलिस उपनिरिक्षक होण्यासाठी सदृढ तब्येत लागते हेच मला माहित होते आणि तसाही स्पोर्टसमध्ये मला सुरूवातीपासूनच आवड होती. असेच एकदा एका वृत्तपत्रात बातमी वाचली... “कमवा ४०००० ते ६००००” मर्चंट नेव्ही जॉईन करा... इंडियन मराईन कॉलेज, हैदराबाद.... ती जाहिरात कशाची होती ह्याचा मी त्यावेळी शोधही घेतला नाही आणि मर्चंट नेव्ही म्हणजे काय हेही त्यावेळी मला माहित नव्हते. संगमनेरातील काही लोकांकडे चौकशी केली तेव्हा व्यापारी जहाजांवर नौकरीची जाहिरात आहे हेच मला समजले. काही होवो जहाजावर नौकरी करायचीच. आणि सगळ्यात महत्वाचे लहानपणापासून जग पहाण्याची इच्छादेखील अगदी फुकट पुर्ण होईल हा विचार.
             पैसा ही गोष्ट आयुष्य जगण्यासाठी किती महत्वाची आहे आणि पैसा काय चीज आहे हे पहिल्यांदा कळले. हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती त्यावेळी बेताचीच होती असे म्हणावे लागेल. बहिणीचे लग्न नुकतेच झालेले त्यासाठी वडिलांनी कुठे कुठे कर्ज काढले होते ते त्यांनाच माहित त्यात भावाचा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला होता. त्यात माझा हैदराबादला जाण्याचा निर्णय.. घरात वेगळेच वातावरण झाले. जाहिरात पाहून अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्याच. शेजारच्या काकूंनी तर सरळ सांगितले की ६० हजार पगार राष्ट्रपतीलाही नाही ह्याला कोण देणार. म्हणजेच “झालो यशस्वी तर जिंकलो अन्यथा बरबादी” परत चान्स नाही... मुळातच सर्व मित्र इंजिनियरिंग/डॉक्टरला गेले असतांना व उरलेले बीएसस्सी करत असतांना असा विचित्र निर्णय म्हणजे काहीतरी जगावेगळंच होतं माझ्यासाठी नि जगासाठी. निर्णय घेतला होता. पन्नास रू पाठवून ब्रोशरही आले नेमके श्रावणात तिस-या सोमवारी देवाचा कौल समजुन जाण्याचा निर्णय घेतला व जगाविरूद्ध किंवा प्रवाहाविरूद्ध जाण्याचाच तो निर्णय होता माझ्यासाठी. “मध्यमवर्गीयांनी जणू मोठे स्वप्नच पाहू नये” असाच काही प्रकार माझ्या नातेवाईकांसाठी होता. निर्णय तर घेतला पण पैश्याचे काय. परिस्थिती हालाखीची? तेव्हा आई पाठिशी ठामपणे उभी राहिली. दागिण्यांवर आईचे जिवापाड प्रेम त्यात आधीच बरेचसे गहाण पडले होते उरलं सुरलं मंगळसूत्रही माझ्यासाठी गहाण टाकलं आणि मला पाठवलं हैदराबादला. तिथे फी भरली व होस्टेलला राहण्याची व्यवस्था वडिलांनी केली. तेव्हडी एकमेव भेट वडिलांची हैदराबादला. आणि ते निघून गेले. जेमतेम खाणावळ आणि रूमचे भाडे भरेल एव्हडे पैसे देऊन.
            कमी पैश्यात कसे दिवस काढायचे आणि असलेल्या पैश्यात वेळ कशी मारून न्यायची ह्याचे खरे ज्ञान आले होस्टेललाच. काही दिवसांत होस्टेलही सोडण्य़ाचा निर्णय घेतला व रूमवर गेलो... धाडसी निर्णय घेणे म्हणजे काय हे पहिल्यांदा अगदी अश्या किरकोळ गोष्टींतून शिकलो. तसेच “एकदा निर्णय घेतला की जे होईल ते होईल परत माघार ह्यायची नाही अशी शिकवणही अश्याच छोट्या अनुभवांतून शिकलो. होस्टेल सोडले नि  २० किमी अंतरावर रूम घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला. मुर्खपणाचे निर्णय नंतर कसे त्रासदायक ठरतात हे १९९३ च्या बाबरीमस्जिद दंगलीत लागलेल्या कर्फ्यूत समजले. जिथे सुविधा असतील तिथेच राजधानी असावी हेही ह्या प्रसंगातून शिकले व आजही व्यवसायात निर्णय घेतांना विशेषतः जागा निवडतांना खुपच अनुभव येत असतो. व्यवसायातील निर्णक्षमता व स्टॉप लॉस ही अर्थशास्त्रातील संज्ञा ह्याचे प्रत्यंतर चुकीच्या निर्णय घेतल्याने पैसे वाचतच नाही उलट जास्त जातात अश्यावेळी पटकन निर्णय घेऊन ती दुरूस्ती करावी ह्याचे शिक्षण त्यातूनच मिळाले आणि कंपनी डबघाईला जाणे म्हणजे काय तसेच बॅंकरप्ट होणे म्हणजे काय हे विद्यार्थीदशेतच कमी पैश्यात दिवस काढल्याने शिकलो.
            कमी पैश्यात वेळ मारून नेण्यासाठी एका ४रू थाळी असलेल्या हॉटेलमध्ये दुपारी जेवण तर संध्याकाळी मेसमध्ये जेवण करायचो. कधी कधी पैसे नसले तर चहा पिऊन भूक मारायचो.
            इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतल्यावर ६०हजाराची नौकरी मिळेल व सेटल होऊ असे वाटले होते... पण ते एव्हडे सोपे नाही हे सिनियर विद्यार्थ्यांना भेटल्यावर कळले.... ती परिक्षा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होती व तिचा निकाल केवळ १-२% लागतो हेही समजले. हे सर्व ऎकूण पायाखालची जमीनच सरकली... बापरे ...! मी तर एकदम सामान्य बुद्धीचा विद्यार्थी.... त्यात डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन इंजिनियरिंग लेव्हलचा तीन वर्षाचा अभ्यासक्रम केवळ १ वर्षात पुर्ण करायचा???? कुठून आलो आणि फसलो असं झालं. त्यात दुसरी बातमी आली... की रेडिओ ऑफिसर हे पदच रद्द करण्यात येणार आहे आणि त्याबदल्यात जीएमडीएसस हा अभ्यासक्रम येणार आहे आणि त्यासाठी जहाजावर कोणत्या स्पेशल व्यक्तीची गरज पडणार नाही. जबरदस्त टेन्शन आले. घरी फोन करून अंदाज घेतला. आईने “चिंता” व्यक्त केली पण वडिलांनी जे होईल ते होईल कर पुढचं पुढं बघू.... असं म्हटल्याने जबरदस्त चिंता वाटली.... कारण एकतर अभ्यासक्रम अवघड त्यात घरी फेकलेले ब्रम्हास्त्राचा काहीच फायदा झाला नाही.. फुसकाच निघाला....! पण चुकीचा निर्णय जरी असला तरी कधीकधी तो निर्णयही फायद्याचा ठरू शकतो हे मी हैदराबादच्या चुकीच्या त्या निर्णयामुळेच शिकलो.

No comments:

Post a Comment